
बुरशीनाशकांची सुरक्षित हाताळणी काळाची गरज; RHWE विद्यार्थिनींचा जनजागृती उपक्रम
वाहतूक, साठवणूक आणि फवारणीत घ्या ही काळजी; आंदुर्ले येथे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन
कुडाळ : प्रतिनिधी
ग्रामीण कृषी कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमांतर्गत आंदुर्ले येथे शेतकरी श्री. जयवंत परब यांच्या शेतावर “वाहतूक, साठवणूक व फवारणी दरम्यान बुरशीनाशक व कीटकनाशकांच्या वापरातील सुरक्षितता उपाय” या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.
या प्रात्यक्षिकास एकूण 10 शेतकरी उपस्थित होते. त्यामध्ये 9 पुरुष व 1 महिला शेतकऱ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना बुरशीनाशक व कीटकनाशकांची सुरक्षित हाताळणी, साठवणूक व फवारणी याबाबत मार्गदर्शन करणे हा होता. तसेच वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (PPE) वापर, योग्य फवारणी पद्धती आणि सुरक्षित कृषी पद्धतींबाबत जनजागृती करण्यात आली.
प्रात्यक्षिकादरम्यान बुरशीनाशके व कीटकनाशके नेहमी त्यांच्या मूळ लेबलयुक्त डब्यांमध्येच वाहतूक व साठवणूक करावीत, ती अन्नपदार्थ, पशुखाद्य व लहान मुलांपासून दूर ठेवावीत, याबाबत माहिती देण्यात आली. तसेच योग्य प्रमाणात औषधांचा वापर, शिफारशीनुसार फवारणी करणे आणि वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर केल्यास आरोग्यावरील धोके कमी होऊन रोग व कीड व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येते, असे सांगण्यात आले. याशिवाय रिकाम्या बुरशीनाशक व कीटकनाशकांच्या डब्यांची सुरक्षित विल्हेवाट लावण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. यामुळे मानवी आरोग्य, पशुधन व पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होते, असेही मार्गदर्शन करण्यात आले.
प्रात्यक्षिकानंतर शेतकऱ्यांनी बुरशीनाशक व कीटकनाशकांच्या सुरक्षित वापराचे महत्त्व समजल्याचे सांगितले. वाहतूक, साठवणूक आणि फवारणी करताना आवश्यक ती काळजी घेणे, सुरक्षा साधनांचा वापर करणे तसेच रिकाम्या कंटेनरची योग्य विल्हेवाट लावणे याबाबत त्यांना उपयुक्त माहिती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. हे प्रात्यक्षिक कु. समृद्धी कुंभार, कु. धनश्री कुंभार, कु. संजीवनी झेंडे, कु. अनघा परब, कु. प्रिती मालणकर, कु. अभिज्ञा हरमलकर, कु. आयशा व कु. इशिका राज या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमांतर्गत कार्यरत विद्यार्थिनींनी आयोजित केले.









