
प्रारूप विकास आराखड्यावर हरकती-सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
‘प्रत्येक नागरिकाच्या न्याय्य हिताचे संरक्षण केले जाईल’; नगराध्यक्षांची पारदर्शक प्रक्रियेची हमी
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहराचा प्रारूप विकास आराखडा हा शहराच्या भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय असून, या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग आणि विश्वास हेच नगरपंचायतीचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी स्पष्ट केले आहे. प्रारूप विकास आराखड्याबाबत कोणत्याही प्रकारची घाई, बळजबरी अथवा नागरिकांवर अन्याय होईल, असा कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
नगरपंचायत प्रशासनाने प्रारूप विकास आराखड्याची माहिती जाहीर प्रकटनाद्वारे नागरिकांसमोर ठेवली आहे. तसेच नागरिकांना सहज माहिती मिळावी या उद्देशाने शहरातील प्रत्येक वॉर्डातील प्रमुख चौकांमध्ये प्रारूप आराखड्याची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. सध्या नागरिकांच्या हरकती व सूचना नियमानुसार स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून, नगरपंचायत कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या हरकती व्यवस्थित नोंदवून घेतल्या जात आहेत. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन प्रशासनाकडून केले जात आहे. प्रारूप विकास आराखड्याबाबत कोणतीही घाई, बळजबरी अथवा कोणत्याही नागरिकांवर अन्याय होईल अशा प्रकारे कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. सर्व नागरिकांच्या सूचना, हरकती आणि मते यांचा कायद्यानुसार व वस्तुनिष्ठपणे विचार करूनच पुढील कार्यवाही केली जाईल. कुडाळ शहराचा विकास हा सर्व नागरिकांच्या सहभागातून आणि विश्वासातूनच व्हावा, हीच नगरपंचायतीची भूमिका आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा गैरसमजांना बळी न पडता, अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा व आपल्या सूचना व हरकती नियोजित मुदतीत नगरपंचायतीकडे सादर कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नगराध्यक्ष म्हणून मी सर्व नागरिकांना आश्वस्त करते की, प्रारूप विकास आराखड्याबाबत प्रत्येक नागरिकाच्या न्याय्य हिताचे पूर्ण संरक्षण केले जाईल आणि सर्व प्रक्रिया पारदर्शक, कायदेशीर व लोकाभिमुख पद्धतीनेच राबविली जाईल असे नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी म्हटले आहे.









