ठळक घडामोडी

एप्रिलच्या शिल्लक धान्य वितरणाचा पेच; कुडाळ तालुका धान्य दुकानदार संघटनेचे आमदार निलेश राणेंना निवेदन!

ई-पॉस प्रणालीत पर्याय बंद, धान्य दुकानांत साठा अडकला; शासनाकडून तातडीच्या मार्गदर्शनाची मागणी

आ.निलेश राणेंच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आश्वासन

कुडाळ : प्रतिनिधी
     शासनाच्या आदेशांतील बदल, ई-पॉस प्रणालीतील तांत्रिक अडचणी आणि धान्य पुरवठ्यात झालेला विलंब यामुळे एप्रिल महिन्यातील धान्य वितरणाचा पेच कुडाळ तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांसमोर निर्माण झाला आहे. माहे एप्रिल २०२६ चे शिल्लक धान्य वितरण कशा पद्धतीने करावे, याबाबत शासनाकडून तातडीने मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी कुडाळ तालुका धान्य दुकानदार संघटनेने आमदार निलेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
        तालुका धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह धान्य दुकानदारांनी शुक्रवारी कुडाळ येथे जि.प.उपाध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल व शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नारकर यांची भेट घेऊन याप्रश्नी लक्ष वेधले तसेच सदरचे निवेदन त्यांच्यामार्फत आमदार निलेश राणे यांना पाठविण्यात आले. दरम्यान आ.राणे यांच्या माध्यमातून हा प्रश्नी लवकरच निकाली काढण्यात येईल असे आश्वासन श्री.साईल व श्री.नारकर यांनी धान्य दुकानदार संघटनेला दिले.
      या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या आदेशानुसार एप्रिल, मे आणि जून २०२६ या तीन महिन्यांचे धान्य एकत्रितपणे वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कुडाळ तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांनी उपलब्ध होईल तसे तीन महिन्यांचे धान्य वितरित करण्यास सुरुवात केली. मात्र धान्याचा पुरवठा दोन टप्प्यांत झाला. दरम्यान, १५ मे २०२६ रोजी शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता एप्रिल महिन्याच्या धान्य वितरणाचा पर्याय ई-पॉस मशीनवरून बंद करण्यात येणार असल्याचे कळविले. त्यामुळे शासनाच्या या आदेशामुळे त्याच दिवसापासून एप्रिल महिन्याचे धान्य वितरण ई पाॅस मशीनवरून  पूर्णपणे बंद झाले. याच काळात वाहतूक संपामुळे कुडाळ गोदामात धान्य उशिराने पोहोचले. धान्य उपलब्ध होताच दुकानदारांनी गरजेनुसार छोट्या दुकानांना प्राधान्याने पुरवठा केला. मात्र अनेक दुकानांमध्ये धान्य १६ मेनंतर पोहोचले. तोपर्यंत ई-पॉस प्रणालीत एप्रिल महिन्याचा पर्याय बंद झाल्याने संबंधित धान्याचे वितरण करणे शक्य झाले नाही. परिणामी एप्रिल महिन्याचे धान्य दुकानांमध्येच अडकून पडले आहे. ई-पॉस मशीनला माहे एप्रिल महिन्याचा पर्याय बंद झाल्यामुळे दुकानदारही काही करू शकले नाहीत. केवळ मुदतवाढ मिळेल या आशेवर दुकानदार थांबले.
     आता ग्राहकांकडून एप्रिल महिन्याचे धान्य कधी मिळणार, अशी सातत्याने विचारणा होत असून दुकानदारांनाही याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर देता येत नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे. शासनाकडून मुदतवाढ मिळेल, या अपेक्षेने दुकानदार प्रतीक्षा करत होते. मात्र शासनाने २४ जून २०२६ रोजी केवळ जून महिन्याच्या धान्य वितरणालाच मुदतवाढ देण्यात आल्याचे समजले. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या शिल्लक धान्याचे पुढे काय करायचे, हा मोठा प्रश्न दुकानदारांसमोर उभा राहिला आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे संपर्क साधला असला तरी अद्याप कोणतेही मार्गदर्शन अथवा उत्तर प्राप्त झालेले नाही. त्यामुळे आमदार निलेश राणे यांनी या प्रश्नात लक्ष घालून शासनाकडून तातडीने मार्गदर्शन मिळवून द्यावे, तसेच एप्रिल २०२६ च्या शिल्लक धान्य वितरणाबाबत योग्य निर्णय व्हावा, अशी मागणी कुडाळ तालुका धान्य दुकानदार संघटनेने केली आहे. यावेळी कुडाळ सभापती मिलिंद नाईक, जि.प.माजी अध्यक्ष काका कुडाळकर, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर तसेच तालुक्यातील धान्य दुकानदार उपस्थित होते.

error: Content is protected !!