
कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांची मध्यरात्री घटनास्थळी धाव
जेसीबीद्वारे पुलाला अडकलेले ओंडके हटवण्याचे आदेश

कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील तेंडोली परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने तेथील उज्वला नदीला पूर आल्याने गेले दोन दिवस तेंडोली – तांबाडगेवाडीचा मुख्य संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नदीच्या प्रवाहात वाहून आलेली मोठी झाडे, ओंडके पुलाखाली अडकल्याने पाण्याचा निचरा थांबला आणि नदीचे पाणी पुलावरून वाहू लागले. परिणामी, तांबाडगेवाडीतील सुमारे २५ ते ३० कुटुंबे बाहेरील जगापासून पूर्णपणे विलग झाली असून ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या पुलाची उंची अत्यंत कमी असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते. थोडा जरी जोरदार पाऊस झाला तरी नदीचे पाणी पुलावरून वाहू लागते आणि संपूर्ण वाडीचा संपर्क तुटतो. त्यामुळे शालेय विद्यार्थी, वृद्ध, महिला आणि आजारी व्यक्तींना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. तांबाडगेवाडीला जोडणारा एकमेव लोखंडी साकवही आता जीर्ण झाला असून, पुराच्या पाण्याचा दबाव आणि वाहून येणाऱ्या ओंडक्यांमुळे तो कधीही कोसळण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. कायमस्वरूपी उंच पूल उभारण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा जोरदारपणे केली आहे.
दरम्यान, याबाबतची माहीती मिळताच कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी काल बुधवारी रात्री तत्काळ प्रशासनासह मध्यरात्री घटनास्थळी धाव घेतली. रात्री सुमारे ११.१५ वाजता त्यांनी महसूल अधिकाऱ्यांसह पूरग्रस्त पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान पुलाखाली नदीतून वाहून आलेली मोठी लाकडी ओंडकी आणि कचरा अडकल्यामुळे पुलाखालील पाचही नळे पूर्णपणे बंद झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नदीच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पूरस्थिती अधिक गंभीर झाली होती.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन तहसीलदार सचिन पाटील यांनी आज सकाळीच जेसीबीच्या सहाय्याने पुलाखाली अडकलेली ओंडकी हटवण्याचे आदेश दिले. यामुळे पाण्याचा निचरा सुरळीत होऊन ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
तहसीलदार पाटील यांनी तांबाडगेवाडीला जोडणाऱ्या पुलाची आणि जीर्ण लोखंडी साकवाची सद्यस्थिती लक्षात घेऊन याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती दिली. कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून पुलाची उंची वाढवणे आणि नवीन साकव उभारण्याच्या कामाला मंजुरी मिळावी, अशी शिफारसही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या मध्यरात्रीच्या पाहणीवेळी निवासी नायब तहसीलदार, स्थानिक तलाठी, पोलीस पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने हालचाल केल्यामुळे ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार, याकडे आता तेंडोली आणि तांबाडगेवाडीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तातडीने कार्यवाही!
गाव मौजे तेंडोली येथील तांबाडगेवाडीजवळील उज्वला नदीवरील पूलावर लाकडी ओंडके व कचरा साठल्यामुळे पूलावरून पाणी वाहत होते.त्यामुळे वाहतूक बंद झाली होती.तरी सदर पूलावरील गुरूवारी दि.२जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३०वाजता स्थानिक रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र विलास राऊळ यांच्या सहकार्याने जेसीबी द्वारे सर्व कचरा बाजूला करण्यात येवून नागरिकांसाठी रहदारीसाठी खुला करण्यात आल्याची माहीती कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.









