
सिंधुदुर्गात पावसाचा जोर; गेल्या चोवीस तासांत सरासरी 52.37 मि.मी. पावसाची नोंद
अतिवृष्टीत नानेली, असणियेत घरांचे नुकसान; पडझडीच्या अनेक घटना
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर कायम आहे. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या या पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडून नुकसान झाले. जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात सरासरी 52.37 मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली आहे.
कुडाळ तालुक्यातील वालावल मुर्तळीवाडी, मुड्याचा कोंड येथे सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास तेथील डोंगरालगतच्या धोकादायक दरडीचा भला मोठा दगड सुधाकर मधुकर राऊळ यांच्या घरावर येऊन धडकला. यात घराच्या भिंतींना तडे गेले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला पण घराचे 30000 रू.चे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने दुपारी दोन वाजताच्या सुमारास नानेली येथील श्रीमती दत्ताराम आरेकर यांच्या राहत्या घरावरील कौल व पत्रे पडून अंशत : नुकसान झाले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील असणिये येथील सावित्री साबाजी सावंत यांच्या राहत्या घरावर काल रात्री नारळाचे झाड पडून सुमारे 20,000 रू.चे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी पावसामुळे कणकवली तालुक्यातील उल्हासनगर सजा मधील मौजे. श्रीनगर येथील श्री.नंदकिशोर नाईक यांच्या घराचे अंदाजे रुपये 2500 रू.चे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वैभववाडीत सर्वाधिक 98 मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली. देवगड – 47 मि.मी., मालवण 50 मि.मी., सावंतवाडी 20 मि.मी., वेंगुर्ला 15 मि.मी., कणकवली 59 मि.मी., कुडाळ 92 मि.मी., व दोडामार्ग 38 मि.मी. पाऊस कोसळला.









