ठळक घडामोडी

सिंधुदुर्गच्या संतोष गावडे यांना राज्याचा प्रतिष्ठेचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान!

रानबांबुळीच्या प्रगतशील शेतकऱ्याचा मुंबईत राज्यस्तरीय गौरव; कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल

आधुनिक शेतीला मिळाले यशाचे फळ; संतोष गावडे यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च कृषी सन्मान

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी गावचे प्रगतशील शेतकरी संतोष अंकुश गावडे यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार-2024’ प्रदान करून गौरविण्यात आले. कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, आधुनिक शेतीचा अवलंब आणि इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरलेल्या योगदानाची दखल घेत हा राज्यस्तरीय सन्मान त्यांना देण्यात आला.
     महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा कृषीदिनानिमित्त १ जुलै रोजी मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे उत्साहात पार पडला. राज्यभरातील विविध कृषी पुरस्कार विजेत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यामध्ये सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व करत संतोष गावडे यांनी मानाचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार-2024’ स्वीकारला.
     पुरस्कार वितरण सोहळ्यास महामहीम राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, रोजगार मंत्री भरतशेट गोगावले, राज्यमंत्री (कृषी) ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री (मृद व जलसंधारण) इंद्रनील नाईक, सहसचिव (भा.प्र.से.) परिमल सिंह तसेच कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारताना संतोष गावडे यांच्यासमवेत त्यांची पत्नी माधवी गावडे, बंधू संदीप गावडे, भाचा अजय चव्हाण तसेच सहाय्यक कृषी अधिकारी प्रिया खरवडे उपस्थित होत्या. त्यामुळे हा सन्मान संपूर्ण गावडे कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण ठरला.
      पुरस्कार स्वीकारल्यानंतर संतोष गावडे यांनी, “हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या कुटुंबाच्या अथक परिश्रमांचा आणि कृषी विभागाच्या मोलाच्या मार्गदर्शनाचा सन्मान आहे. महाराष्ट्र शासन व कृषी विभागाचे मी मनःपूर्वक आभार मानतो,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब आणि इतर शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संतोष गावडे यांच्या या यशामुळे रानबांबुळी गाव, कुडाळ तालुका आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!