ठळक घडामोडी

वालावल-मुर्तळीवाडी दरड दुर्घटना: कुडाळ तालुका प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये!

तहसीलदारांकडून प्रत्यक्ष पाहणी; घरांचा पंचनामा पूर्ण, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी
            कुडाळ तालुक्यातील वालावल-मुर्तळीवाडी येथे दरड कोसळल्याची घटना घडल्यापासून कुडाळ तालुका प्रशासन पूर्णपणे सतर्क असून, महसूल यंत्रणा अपघात स्थळावर २४ तास तैनात आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सजग असून बाधित नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.
         या घटनेची माहिती मिळताच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महसूल कर्मचाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन तातडीने जेसीबीची सोय केली व रस्त्यात आलेले मोठे दगड हलवून मार्ग मोकळा केला. तसेच, भविष्यात दुर्दैवाने पुन्हा वरून दगड कोसळल्यास खालील घरांना कोणतीही क्षती पोहोचू नये, यादृष्टीने तिथे तात्पुरती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे.
    तहसीलदारांकडून आढावा; स्थलांतराचे निर्देश
      कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांनी आज स्वतः दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. येथील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न विचारात घेऊन त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत अंशतः नुकसान झालेल्या घराचा पंचनामा महसूल विभागामार्फत पूर्ण करण्यात आला असून, शासनातर्फे लवकरात लवकर मदत देण्याची तजवीज करण्यात येत आहे.
             चालू वर्षातील नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी कुडाळ तालुक्याची आपत्ती व्यवस्थापन बैठक २४ एप्रिल रोजी मा. प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. या बैठकीत प्रशासकीय विभागासह स्थानिक सरपंच व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. याच बैठकीत दिलेल्या पूर्वसूचनांमुळे प्रशासनाला या दुर्घटनेनंतर तात्काळ मदतकार्य राबवणे सोपे झाले.
अफवांना बळी पडू नका: प्रशासनाचे आवाहन
           कुडाळ तालुका प्रशासन कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आणि सतर्क आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही भूलथापा किंवा खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये. आपत्तीच्या काळात कोणतीही माहिती हवी असल्यास किंवा पडताळायची असल्यास थेट प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांनी केले.

error: Content is protected !!