
प्रशासनाची घटनास्थळी धाव ; दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
साळगाव, असलदेत घरावर झाड पडून नुकसान; विजेचा लपंडाव सुरू

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारीही धुवाॅधार पावसाचा जोर कायम आहे. अतिवृष्टीत ठिकठिकाणी झाडे पडून तसेच पडझडीच्या घटना घडून मोठे नुकसान झाले तर वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात रात्री ९.३० वाजताच्या सुमारास दरड कोसळून मुरूम व माती रस्त्यावर आल्याने वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे. माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
कुडाळ तालुक्यातील साळगाव-जांभरमळा (मळावाडी) येथे बाबू चंद्रकांत नाईक यांच्या घराशेजारील सागाचे झाड दुपारी सुमारे ३.१५ ते ३.३० वाजण्याच्या दरम्यान घरावर कोसळल्याने घराचे अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
माणगाव डोंगरवाडी-जोळवाडी मार्गावर सकाळी आंब्याचे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली तसेच वीजपुरवठाही खंडित झाला. मात्र प्रशासनाने तातडीने झाड हटवून रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला. देवगड तालुक्यातील कातवनेश्वर येथील संजय तुकाराम आचरेकर यांच्या गोठ्यावरील कंपाऊंड भिंत कोसळून सुमारे २२ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले. मालवण तालुक्यातील खेरवंद येथील वसंत सदाशिव पडावे यांच्या गोठ्यावर झाड कोसळून नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कणकवली तालुक्यातील फणसनगर येथे गोपाळ नारायण बोंद्रे यांच्या मांगरावर झाड कोसळल्याने सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच असलदे गावातील भालचंद्र लोके यांच्या राहत्या घरावर नारळाचे झाड पडल्याने पत्रे व खांबांचे सुमारे ८ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच कुडाळसह जिल्ह्यात ठिकठिकाणी विजेचा लंपडाव सुरू झाला आहे. काही ठिकाणी वीज, इंटरनेट सेवाही विस्कळीत झाल्याचे दिसून आले आहे.









