
नागरिकांच्या पाठपुराव्याला यश; सा. बां. विभागाची तातडीची कार्यवाही
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ–वेंगुर्ला मार्गावरील पिंगुळी गोंधळपूर येथे पूर्णब्रह्म हॉटेल दरम्यानच्या रस्त्यालगत दुतर्फा उभी असलेली सुकलेली व धोकादायक सुरूची झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी सकाळी हटविली.
दोन दिवसांपूर्वी याच मार्गावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वारावर सुकलेल्या झाडाची फांदी पडून तो जखमी झाल्याच्या घटनेनंतर नागरिकांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
या ठिकाणी रस्त्यालगत काही सुरूची झाडे अत्यंत धोकादायक अवस्थेत उभी होती. याबाबत दीपक गावडे, चेतन राऊळ तसेच ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधून धोकादायक झाडे तात्काळ हटविण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रविवारी जेसीबी व अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने सर्व धोकादायक सुरूची झाडे तोडून हटविण्यात आली. या वेळी मंगेश चव्हाण, तन्मय वालावलकर, चेतन राऊळ, दीपक गावडे, अजय बांदेकर, मयूर परब, दत्तगुरू राऊळ, राकेश गावडे, समीर मयेकर, मंदार साटम, विजय सडवेलकर आदींनी मदतकार्यात सहभाग घेतला. सरपंच अजय आकेरकर व उपसरपंच मंगेश मस्के यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. धोकादायक झाडे हटविल्याने कुडाळ–वेंगुर्ला मार्गावरील संभाव्य अपघाताचा धोका टळला असून वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.









