
पालकमंत्री नितेश राणेंची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; टोल संदर्भात जिल्हावासियांना दिलेला शब्द केला पूर्ण
सिंधुदुर्गातील वाहनधारकांना कोणत्याही अडचणी शिवाय होणार प्रवास; व्यावसायिक वाहनांना ही ५० टक्के टोल माफी
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट देत ओसरगाव टोल संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जिल्ह्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन ओसरगाव टोल नाक्यावर एमएच-०७ क्रमांकाच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देत विशेष सवलत देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर पिवळी पाटी असणाऱ्या व्यावसायिक गाड्यांना 50 टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
आपल्या वाढदिवसानिमित्त जनतेशी संवाद साधताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने राणे कुटुंबीयांना आणि भारतीय जनता पक्षाला नेहमीच भरभरून आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जनतेसाठी काहीतरी देण्याची भावना मनात होती. जनतेची सेवा करणे आणि त्यांच्या प्रत्येक अडचणीसाठी लढणे हेच आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
ओसरगाव टोलच्या मुद्द्यावर जिल्ह्यातील नागरिक,व्यावसायिक यांनी टोल माफीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आपण सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करताना ओसरगाव टोल नाक्यावर एमएच-०७ क्रमांकाच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून दिली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे जिल्ह्यातील वाहनधारकांना कोणत्याही अडचणी शिवाय प्रवास करता येणार आहे. याशिवाय पिवळ्या क्रमांकाच्या (व्यावसायिक) वाहनांसाठी संबंधित कंपनीने टोल दरात ५० टक्के सवलत जाहीर केल्याची माहितीही त्यांनी दिली. हा निर्णय जिल्ह्यातील व्यावसायिक आणि वाहतूक क्षेत्रासाठी दिलासादायक ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या निर्णयासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनेत्रा पवार तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नितेश राणे यांनी आभार मानले.
“माझ्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याच्या जनतेच्या मनातील एक महत्त्वाचा प्रश्न सोडविण्यात यश आले, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे,” असे सांगत त्यांनी सिंधुदुर्गवासीयांनी एमएच-०७ क्रमांकाच्या वाहनांचा वापर करून,निर्माण केलेल्या स्वतंत्र लेनचा वापर करावा असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.









