ठळक घडामोडी

विठ्ठलभक्ती, समाजसेवा अन् संस्कृतीचा आधारवड हरपला!

सिंधुदुर्गनगरी येथील चंद्रकांत ओरसकर यांचे निधन

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
     आयुष्यभर विठ्ठलनामाचा गजर ओठी, समाजसेवेची तळमळ हृदयात आणि संस्कृती जपण्याची ओढ कृतीत जपणारे चंद्रकांत संभाजी ओरसकर (उर्फ चंदूकाका) यांचे सोमवारी दुपारी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ ओरसकर कुटुंबीयांवरच नव्हे, तर संपूर्ण परिसर, वारकरी संप्रदाय आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. ते ७५ वर्षाचे होते.
            चंद्रकांत संभाजी ओरसकर (उर्फ चंदू चंदूकाका) हे नाव परिसरात श्रद्धा, सेवा आणि माणुसकीचे प्रतीक म्हणून ओळखले जात होते. वारकरी संप्रदायाशी त्यांची असलेली अखंड नाळ आणि विठ्ठलभक्ती ही त्यांच्या जीवनाची ओळख होती. आषाढी आणि कार्तिकी वारीला पायी पंढरपूर गाठण्याचा त्यांचा अनेक वर्षांचा नियम कधीही खंडित झाला नाही. “विठ्ठलनामातच जीवनाचे सार आहे,” हा त्यांचा जीवनविचार त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत असे.
        रवळनाथ मित्र मंडळ संस्थेचे प्रमुख पदाधिकारी म्हणून त्यांनी अनेक धार्मिक, सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांना दिशा दिली. रवळनाथ देवस्थानचे मानकरी म्हणूनही त्यांनी परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्य जपण्यासाठी सातत्याने योगदान दिले. परिसरातील प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगी ते सर्वप्रथम धावून जाणारे, सर्वांना आधार देणारे आणि प्रेमाने जोडणारे ज्येष्ठ म्हणून त्यांचा मोठा सन्मान होता. ताई काय त्यांनी वृत्तपत्र विक्रेते म्हणूनही काम केले.
        सामाजिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. सामाजिक नाटकांमधील त्यांच्या विनोदी भूमिका प्रेक्षकांना खळखळून हसवत, तर खलनायकाच्या भूमिका त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे विशेष गाजत. रंगभूमीवरील त्यांचा सहज व नैसर्गिक अभिनय आजही अनेकांच्या स्मरणात राहील.
त्यांच्या साधेपणाने, प्रेमळ स्वभावाने आणि निरपेक्ष समाजसेवेने त्यांनी असंख्य माणसे जोडली. म्हणूनच त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अनेकांनी “आपल्यातील एक प्रेमळ, दिलदार आणि सेवाभावी ज्येष्ठ हरपला” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, विवाहित मुलगी, जावई, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. हॉटेल व्यावसायिक संतोष ओरसकर यांचे ते चुलते होत.

error: Content is protected !!