
अन्नपदार्थ विक्रेत्यांसाठी महत्त्वाची संधी; नवीन नियमांबाबत मिळणार मार्गदर्शन
अन्नसुरक्षा नियम समजून घ्या, दंडात्मक कारवाई टाळा; व्यापारी महासंघ-हाॅटेल संघटनेचे आवाहन
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, खानावळ चालक, बेकरी, केक शॉप, मिठाई विक्रेते, किराणा व्यापारी, चायनीज सेंटर, कोकणी मेवा, वडापाव सेंटर तसेच अन्य खाद्यपदार्थ विक्रेत्या व्यावसायिकांसाठी अन्नसुरक्षा नवीन कायदे माहिती व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने हे मोफत प्रशिक्षण शिबिर सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता कुडाळ हायस्कूल शेजारील मराठा समाज हॉल येथे होणार आहे.
अन्नपदार्थांचे पॅकेजिंग, बदललेले अन्नसुरक्षा नियम, परवाना, लेबलिंग तसेच अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत व्यापाऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन या शिबिरात करण्यात येणार आहे. महासंघाच्या विनंतीवरून जिल्ह्याचे अन्नसुरक्षा प्रशासनाचे उपायुक्त श्री. गायकवाड तसेच अन्नसुरक्षा निरीक्षक अभय चंदनशिवे हे उपस्थित राहून व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. यावेळी महासंघाचे पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. प्रत्यक्ष माहिती, प्रश्नोत्तरे आणि नव्या नियमांची सविस्तर माहिती मिळाल्यामुळे व्यापाऱ्यांना भविष्यातील दंडात्मक कारवाई टाळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्न व खाद्यपदार्थांशी संबंधित सर्व व्यापाऱ्यांनी या मोफत प्रशिक्षण शिबिराला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, हॉटेल संघटना, तालुकाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.









