
जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांच्याकडून नुकसानीची पाहणी
कुडाळ : प्रतिनिधी
चेंदवण गावातील टेंबवाडी येथे रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मेस्त्री कुटुंबाच्या तीन घरांवर झाड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत विजय मेस्त्री यांचे देवघर पूर्णपणे जमीनदोस्त झाले, तर श्रीमती गिरीजा मेस्त्री आणि गणपत मेस्त्री यांच्या राहत्या घरांचे छप्पर पूर्णपणे कोसळून भिंतींना तडे गेले आहेत.
घटनेची माहिती मिळताच नेरूर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी संबंधित तलाठी व आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करून शासनाकडून नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, अशा सूचना दिल्या. तसेच या नुकसानीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनाही देऊन आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. यावेळी बाळू कोचरेकर, मंगेश बांदेकर, चेंदवण ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.









