
ऑलिम्पिक चॅम्पियन विल्सन किप्रॉप, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि माजी आमदार वैभव नाईकही धावले
राणे हॉस्पिटलच्या पुढाकारातून कुडाळमध्ये रंगली तिसरी मॉन्सून मॅरेथॉन; क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
कुडाळ : प्रतिनिधी
राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा रनर्स, रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या ‘कुडाळ मॉन्सून रन २०२६’ या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या तिसऱ्या वर्षी तब्बल दोन हजारांहून अधिक धावपटूंनी विविध गटांत सहभाग नोंदवत स्पर्धा यशस्वी केली.
या मॅरेथॉनचे ब्रँड ॲम्बेसेडर, केनिया देशातील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन विजेते व ऑलिम्पिक चॅम्पियन विल्सन किप्रॉप, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधिक्षक मोहन दहीकर आणि माजी आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनीही प्रत्यक्ष धावत सहभागी होत स्पर्धकांचा उत्साह वाढविला. स्पर्धेत ५ कि.मी. फन रन, १० कि.मी., १६ कि.मी. जे.आर. फन रन आणि २१ कि.मी. अशा विविध गटांचा समावेश होता. बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, एमआयडीसी, कुडाळ येथून स्पर्धेला प्रारंभ झाला. नेरूर मार्गे वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर परिसरातील नदीकाठ गाठून पुन्हा बॅ. नाथ पै शिक्षण संस्था येथे स्पर्धेचा समारोप करण्यात आला.
यावेळी शिवसेना (उबाठा) माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरचे डॉ. जी. टी. राणे, अजित राणे, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गजानन कांदळगावकर, डॉ. प्रशांत सामंत, डॉ. जयसिंग रावराणे, रूपेश तेली, शिवप्रसाद राणे, उमेश गाळवणकर, ओंकार तेली, राजू राऊळ, मोहन होडावडेकर, मकरंद नाईक, सचिन मदने, विविध अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच टीम कुडाळ मॉन्सून रनचे सदस्य उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी धावपटूंनी आणि उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.









