
आईची इच्छा अन,…तीने भरलेल्या डोळ्यांनी दिला अग्नी
तळेरे – वाघाचीवाडी येथील ह्रदयद्रावक घटना
नांदगाव : प्रतिनिधी
तन्वी, तुझ्या या धैर्याला सलामच……आईच्या शेवटच्या इच्छेखातर, लेकीने आपल्या आईच्या पार्थिवाला अग्नी देण्याचे धाडस कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथिल ११ वर्षांची चिमुरडी कु.तन्वी संदीप चव्हाण हिने दाखविले. यामुळे तिने आपल्या आईच्या प्रेताला अग्नी देऊन समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करत मुलांप्रमाणेच मुलींनेही आपले कर्तव्या बजावल्याने तीच्या धाडसाला सलाम होत आहे.
मागील ३-४ वर्षा पासून कु.तन्वीची आई सौ. प्रियाका संदीप चव्हाण ही एका आजाराने ग्रस्त असल्याने ती जागेवरच होती.अशावेळी पती, सासरे व एक मुलगी असणा-या या कुटुंबात आधार कोण बनायचे असे असताना तन्वी घराची आधार बनत आईला हिंमत देत आजारातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होती.वडील श्री.संदीप चव्हाण हे तळेरे काम करुन संसाराचा गाढा हाकायचे.यामुळे घरात तन्वीचा मोठा आधार तीच्या आईला होता. तीची मदत घराला लाखमोलाची होती. कु.तन्वी चव्हाण,अवघ्या ११ वर्षाची असून तळेरेतील वामनराम महाडीक माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत आहे.तिचे आजचे वय हे हातात खेळणी घेऊन खेळायचे व आपल्या भविष्यासाठी अभ्यास करायचीही वेळ असताना तिच्या आईला आजारपणाने विळखा घातल्याने ती या वयात आईच्या आजारपणात तिची सावली बनून सेवा करत आधाराची काठी होती.
मात्र ती नुसाती सेवा न करता स्वतः जेवण बनवायची, घरचे आवरून शाळेत जायची. कला क्षेत्रातही तेवढीच हुशार असल्याने ऐवढे करुन त्यातही ती रमायची.मात्र सोमवारी त्याच्या कुटंबावर नीयतीने घाला घालत एकुलत्या एक तन्वीला त्या विळखा घेतलेल्या आजाराने आईपासून दूर केले.इतकी दिवस आईची सेवा करून,आज आईला शेवटचा निरोप देणारी ही तन्वीचे हात थरथरत होते, डोळे ओले होते, पण तिचे धैर्य पाहून साक्षात काळही थबकला असावा अशा वातावरणात तिने आपल्या आईच्या पार्थिवाला अग्नी गावक-यां समवेत देत आईच्या सेवेला शेवटचा निरोप दिला. आईच्या पश्चात पती,एक मुलगी,सासरे असा परिवार आहे.









