ठळक घडामोडी

कोकणकन्या एक्सप्रेसचे वेळापत्रक विस्कळीत!

मुंबईहून मडगांवकडे धावणारी गाडी तब्बल ९ तासांनी उशिरा कुडाळात दाखल

कुडाळ : प्रतिनिधी
         मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून मडगावकडे जाणाऱ्या गाडी क्रमांक २०१११ ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ कुडाळ रेल्वेस्थानकावर नेहमीच्या वेळेनुसार सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी दाखल होणारी आज शनिवारी ही गाडी तब्बल ९ तास उशिराने, संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास स्थानकात पोहोचली. या प्रचंड विलंबामुळे कुडाळ स्थानकावर प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले, ज्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
       या संपूर्ण विलंबामागे काल शुक्रवार, २६ जून रोजी मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या ‘मांडवी एक्सप्रेस’मध्ये झालेला तांत्रिक बिघाड कारणीभूत ठरल्याची माहिती समोर येत आहे. काल शुक्रवारी मांडवी एक्सप्रेस निर्धारीत वेळेपेक्षा विलंबाने मुंबईत पोचली. त्याचा परिणाम कोकणकन्या एक्सप्रेसवर झाला. रात्री अकरा वाजता सुटणारी कोकणकन्या एक्सप्रेस मध्यरात्री तीन वाजता सुटली. ही गाडी आज शनिवारी सायंकाळी तब्बल नऊ तासानी कुडाळ रेल्वे स्थानकात दाखल झाली. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, काल मडगावहून मुंबईला जाणारी मांडवी एक्सप्रेस काही तांत्रिक कारणाने उशिराने पोचली. त्यामुळे कोकणकन्या एक्स्प्रेसला विलंब झाल्याचे सांगण्यात आले.
   दरम्यान, मुंबईहून मडगावकडे जाणारीच कोकणकन्या एक्सप्रेस उशिराने धावल्याने, आजची मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्सप्रेस दोन तास विलंबाने धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. या अनपेक्षित विलंबामुळे कुडाळसह कोकणातील विविध स्थानकांवरील प्रवाशांना तासन्‌तास ताटकळत थांबावे लागले असून, रेल्वे प्रशासनाने भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!