ठळक घडामोडी

कुडाळ विकास आराखड्यावर सुधार समितीच्या सात हरकती!

विकासाच्या नावाखाली नागरिकांवर अन्याय नको; सुधार समितीचे न.पं.ला निवेदन

२४ मीटर रस्ता, ग्रीन झोनसह अनेक मुद्द्यांवर आक्षेप; सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांची माहीती

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ नगरपंचायतीच्या प्रारूप शहर विकास आराखड्याला सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्ट, कुडाळने तीव्र हरकत घेत सात महत्त्वाच्या मुद्द्यांवर नगरपंचायत प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांनी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर आणि मुख्याधिकारी विनायक औंधकर यांची भेट घेऊन नागरिकांच्या वतीने हरकती मांडल्या.
      कुडाळ नगर पंचायतीने शहराचा विकास आराखडा तयार केला आहे, हा विकास आराखडा हा कुडाळातील नागरीकांसाठी अन्यायकारक आहे, असे एकंदरीत आराखडा बघुन आमच्या निर्देशनास येते. त्यामुळे विविध मुद्द्यांचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, कुडाळ अभिमन्यू हॉटेल ते एसटी डेपो पर्यत २४ मीटरचा रस्ता दाखविला आहे हा रस्ता प्रत्यक्षात उतरण्यात आला तर अनेक नागरी कांना बेघर व्हावे लागणार आहे तसेच अनेकांच्या व्यवसायावरती गदा येणार आहे. कुडाळ बाजारपेठे मध्ये ९ मीटरचा रस्ता दाखविण्यात आला आहे त्यामुळे कुडाळ बाजार पेठेतील अनेकांचे व्यवसाय व घरे जुनी घरे पुर्ण पणे बंद होणार आहेत, अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे. नगर पंचायत मालकीच्या मोकळ्या जागा आरक्षीत केलेल्या दिसत नाहीत, त्या जागांवर पुढे काय विकास होणार ते स्पष्ट दाखवले गेलेले नाही. यापुर्वी ही कुडाळ शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता, त्या वरील नागरीकांच्या हरकती ची काय दखल घेण्यात आली?. कुडाळ मधील इतर वार्ड मधील वस्तुस्थिती जाणून घेऊनच आराखडा आखला जावा. आराखडा आखताना कुडाळच्या नागरीकांना विश्वासात घेऊन प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घेणे महत्वाचे आहे असे केले तरच कुडाळचा विकासासाठी कुडाळ नागरीकांचा सहभाग लाभेल. कुडाळातील काही भाग हा ग्रीन झोनमध्ये दाखविण्यात आलेला आहे. तो ग्रीन झोन उठविण्यात यावा. कुडाळ शहराचा विकास हा नागरिकांच्या वर्तमान आणि भविष्याच्या उद्धारासाठी असावा, त्यांचे भविष्य उध्वस्त करण्यासाठी नसावा, असे सुधार समितीने निवेदनात नमूद केले आहे. यावेळी सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांच्या समवेत बनी नाडकर्णी, सतीश वर्दम व नागरिक उपस्थित होते. तसेच उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक अभिषेक गावडे, नयना मांजरेकर उपस्थित होते.

error: Content is protected !!