
शिवसेना (उबाठा) नगरसेवक मंदार शिरसाट यांची मागणी
आरोग्य प्रशासनाचे वेधले लक्ष; तातडीने कार्यवाही करण्याची मागणी
कुडाळ : प्रतिनिधी
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता कुडाळ ग्रामीण रुग्णालयात कुडाळ येणाऱ्या गरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांच्या आरोग्याचा विचार करून रुग्णालयामध्ये सर्पदंशावरील लस, संसर्गजन्य आजारांची औषधे आणि २४ तास तातडीने रक्त तपासणी अहवाल मिळण्याची व्यवस्था करावी, अशी आग्रही मागणी शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा वैद्यकीय अधिक्षक डॉ.श्रीपाद पाटील यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात मंदार शिरसाट यांनी कुडाळ ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधांच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकत विविध मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. पावसाळ्यात तालुक्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते. त्यामुळे रुग्णालयात सर्पदंशावरील लस आणि आवश्यक जीवनरक्षक औषधांचा पुरेसा साठा २४ तास उपलब्ध ठेवण्यात यावा. सध्याच्या स्थितीत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि साथीचे ताप (Fever) वेगाने पसरत आहेत. रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगू नये; सर्व दर्जेदार औषधे रुग्णांना रुग्णालयातच मोफत मिळणे आवश्यक आहे. तापाचे अचूक निदान करण्यासाठी रक्त तपासणी अत्यंत महत्त्वाची असते. हा अहवाल रुग्णांना तात्काळ (Emergency Basis) देण्यात यावा, जेणेकरून रुग्णांवर वेळेवर उपचार सुरू करता येतील.”कुडाळ ग्रामीण रुग्णालयात येणारा रुग्ण हा बहुतांश गरीब व ग्रामीण भागातील असतो. त्यांना खाजगी रुग्णालयांचा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून रुग्णांना तातडीने दिलासा द्यावा,” असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी केले आहे. या निवेदनाची प्रत जिल्हा शासकीय रुग्णालय, सिंधुदुर्ग येथेही आवश्यक कार्यवाहीसाठी सुपूर्द करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना (उबाठा) अमरसेन सावंत, तालुकासंघटक बबन बोभाटे, बाळा पावसकर,संदीप म्हाडेश्वर, गुरु गडकर आदी. उपस्थित होते









