
थकीत ३६ लाखांचे वेतन मिळणार; सप्टेंबरपर्यंत सेवेला मुदतवाढ
आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा फलदायी; कायमस्वरूपी तोडग्यासाठीही चर्चा सुरू

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान निविदेची मुदत संपल्याने रखडलेले सुमारे ३६ लाख रुपयांचे तीन महिन्यांचे वेतन आता अदा करण्यात येणार असून, संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवेला सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहीती आमदार निलेश राणे यांनी दिली.
महिला व बाल रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची निविदा संपुष्टात आल्यामुळे त्यांना नवीन नियुक्ती किंवा मुदतवाढ मिळाली नव्हती. परिणामी, गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचे वेतनही रखडले होते. या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार निलेश राणे यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्यानंतर संबंधित ५२ कर्मचाऱ्यांच्या सेवेला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, थकीत वेतनही अदा करण्यात येणार आहे. तसेच या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार निलेश राणे आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यात चर्चा सुरू असून त्याबाबतही लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, आपल्या मागण्यांची दखल घेऊन मुदतवाढ आणि थकीत वेतन मिळवून दिल्याबद्दल महिला व बाल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.









