ठळक घडामोडी

जि.प.शाळा केरवडे तर्फ माणगाव येथे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ; विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन!

जि.प. सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या पुढाकारातून चौथी-सातवी शिष्यवृत्ती उपक्रमाला प्रारंभ

गणित, मराठी, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी विषयांचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तयारीची संधी

कुडाळ : प्रतिनिधी
      पिंगुळी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या सौजन्याने राबविण्यात येणाऱ्या ‘शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग’ या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी केरवडे तर्फ माणगाव येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत उत्साहात झाला. इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
       कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मोहन भोई, सेवानिवृत्त पर्यवेक्षक विलास परब, केंद्रप्रमुख राजन वारंग, सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत मळगावकर, शिक्षक लक्ष्मण आगलावे, शिक्षिका प्रीती कुबल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. परब, मुख्याध्यापक संजय गवस आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी केरवडेच्या सरपंच श्रिया ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या.
      शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गात विद्यार्थ्यांसाठी दिवसभर विविध विषयांचे नियोजन करण्यात आले होते. उद्घाटनानंतर गणित, मराठी, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी या विषयांवर तज्ज्ञ शिक्षकांनी सखोल मार्गदर्शन केले. अभ्यासातील संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगत शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्न सोडविण्याच्या प्रभावी पद्धती विद्यार्थ्यांना शिकविण्यात आल्या.यानंतर केंद्रप्रमुख सीताराम वारंग यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शक म्हणून एकनाथ कुर्लेकर, विलास गोठोसकर, प्रकाश तेंडोलकर, शिक्षक श्री.आगलावे, श्री.बागवे आणि भडके यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले.
      यावेळी जि.प. सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अधिकाधिक यश मिळवावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे सांगितले. सर्व मुख्याध्यापकांनी पालकांमार्फत विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन वर्गाची माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जुलै 2026 ते जानेवारी 2027 या कालावधीत पंधरा दिवसांतून एकदा असे हे मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात येणार असून शेवटी दोन सराव परीक्षा घेण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्ध होणार असून आगामी शिष्यवृत्ती परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थी यश संपादन करतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संजीवनी गावडे यांनी केले.

error: Content is protected !!