ठळक घडामोडी

कुडाळात उद्या एसटी वार्षिक सवलत कार्ड नोंदणी विशेष शिबिर!

शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचा उपक्रम

१५० रूपयांत नोंदणी कार्ड उपलब्ध; शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ शहरातील नागरिकांना एसटी प्रवासात सवलतीचा लाभ मिळावा तसेच विविध डिजिटल सुविधा एकाच कार्डद्वारे उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शिवसेना कुडाळ शहराच्या वतीने एसटी वार्षिक सवलत कार्ड नोंदणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर उद्या रविवार, १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत महायुती कार्यालय, सिंधुदुर्गचा राजा मैदानाजवळ (पोस्ट ऑफिस चौक नजिक), कुडाळ येथे होणार आहे, अशी माहीती शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी दिली.
     या शिबिरात एसटीचे २०० रू.चे सवलत कार्ड नागरिकांना अवघ्या १५० रू.शुल्कात एसटी वार्षिक सवलत कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्डधारकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून १८ किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक अंतराच्या प्रवासावर १० टक्के भाडे सवलत मिळणार आहे. तसेच महामंडळाच्या अटी व शर्तींनुसार एसटी अपघात विमा संरक्षणाचाही लाभ मिळणार आहे. याशिवाय हे कार्ड केवळ प्रवासापुरते मर्यादित नसून त्याद्वारे रोख रक्कम काढणे, बिल भरणे, मोबाईल रिचार्ज, एअर, बस व रेल्वे तिकीट बुकिंग, फास्टॅग रिचार्ज, ई-चलन भरणा, मनी ट्रान्सफर, विमा सेवा तसेच कर्जाचे हप्ते भरणे अशा विविध डिजिटल सुविधाही उपलब्ध होणार आहेत.
     या विशेष शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख तथा कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक अभिषेक गावडे यांनी केले आहे. त्यांनी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन केले आहे.

error: Content is protected !!