नेरूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरविला गावठी बाजार
गावठी बाजारात सभापतींची ‘खरेदी’; प्रशालेच्या उपक्रमाचे केले कौतुक
कुडाळ : प्रतिनिधी
नेरूर येथील श्री कलेश्वर विद्यामंदीर व प्रायमरी स्कूल यांच्या वतीने आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या गावठी बाजार उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी बाजाराला भेट देत विद्यार्थ्यांकडून भाज्यांची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले.
नेरूर चव्हाटा येथे सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत भरविण्यात आलेल्या या गावठी बाजारात विद्यार्थ्यांनी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या ताज्या भाज्या व विविध वस्तू विक्रीसाठी मांडल्या होत्या. पालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करून विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी सभापती मिलिंद नाईक यांनी उपक्रमाचे कौतुक करत, “विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, आत्मविश्वास आणि उद्योजकतेची भावना रुजविणारा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे,” असे गौरवोद्गार काढले. यावेळी नेरूर सरपंच भक्ती घाडी, माजी पंचायत समिती सदस्य व विभागप्रमुख संदेश नाईक, मुख्याध्यापिका सुनिती नाईक, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









