ठळक घडामोडी

मालवण वाचनालयात चतुर्मास कीर्तनमालेस उत्स्फूर्त प्रारंभ; बाल कीर्तनकार वेदिका लुडबे यांचे प्रभावी कीर्तन!

अभ्यासपूर्ण निरूपणाने श्रोते मंत्रमुग्ध; वेदिका लुडबे यांना उत्स्फूर्त दाद

चतुर्मास कीर्तनमालेचे दुसरे पुष्प ९ ऑगस्टला; विवेक वायंगणकर गुंफणार ‘नाथांना दत्त दर्शन’

मालवण : महेश कदम
      श्री शिवाजी वाचन मंदिर, मालवण यांच्या वतीने गेली २० वर्षे सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या चतुर्मास कीर्तनमालेचा प्रारंभ देवशयनी एकादशीच्या निमित्ताने झाला. यावेळी बाल कीर्तनकार कुमारी वेदिका लुडबे यांनी ‘श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह’ या विषयावर अभ्यासपूर्ण कीर्तन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
     कीर्तनाच्या पूर्वरंगात त्यांनी अभंग व भजनांचे मधुर सादरीकरण केले. तर उत्तररंगात श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाहाचा प्रसंग प्रभावीपणे उलगडत भक्ती, नामस्मरण आणि भगवंतावरील अखंड श्रद्धेचे महत्त्व विशद केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या निरूपणाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
      कीर्तनकारांचा परिचय सौ. मेधा शेवडे यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून सांगता करण्यात आली. कीर्तनाला श्री. सुधीर गोसावी (तबला) व श्री. अक्षय सातार्डेकर (हार्मोनियम) यांनी संगीतसाथ दिली. दरम्यान, चतुर्मास कीर्तनमालेतील दुसरे पुष्प रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सादर होणार असून श्री. विवेक वायंगणकर हे ‘नाथांना दत्त दर्शन’ या विषयावर कीर्तन सादर करणार आहेत.

error: Content is protected !!