ठळक घडामोडी

कुडाळमध्ये झळकला ‘लोकशाही आणि शिक्षणाचा सन्मान’ करणारा अनोखा बॅनर!

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वेधले लक्ष

‘मी हिंसक जमावाचा भाग बनणार नाही’चा संदेश

कुडाळ : प्रतिनिधी
       दिल्लीतील जंतरमंतर येथे नुकत्याच झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर देशभरात निर्माण झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील कुडाळ शहरात एक अनोखा आणि लक्षवेधी बॅनर झळकला असून, तो सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. शिक्षण, लोकशाही आणि शांततामय भूमिका यांचा संदेश देणारा हा बॅनर कुडाळ शहराच्या प्रवेशद्वारावरील काळप नाका परिसरात रस्त्यालगत लावण्यात आला आहे.
      दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जची घटना देशभरात गाजली होती. या घटनेनंतर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याच पार्श्वभूमीवर कुडाळमध्ये झळकलेल्या या बॅनरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
       बॅनरच्या शीर्षस्थानी “राष्ट्र प्रथम” असा ठळक संदेश देण्यात आला असून, त्याखाली “शिक्षणाचा मान, लोकशाहीचा सन्मान” अशी प्रभावी टॅगलाईन देण्यात आली आहे. पुढे बॅनरच्या एका बाजूला “मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे”, तर दुसऱ्या बाजूला “माझा भारतीय लोकशाहीवर विश्वास आहे” असा संदेश देण्यात आला आहे.
बॅनरवर हातात पुस्तक घेऊन अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थीनीचे चित्र असून, तिच्या मागे भारतीय संसदेचे छायाचित्र दाखविण्यात आले आहे. यामधून शिक्षण आणि लोकशाही या दोन्ही मूल्यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येते. याखाली “मी Gen-Z आहे… मी दोघांच्याही बाजूने आहे” असा ठळकपणे उल्लेख करण्यात आला असून, शेवटी “माझा संकल्प – मी हिंसक जमावाचा भाग बनणार नाही” असा संदेश देत शांततामय, संविधानिक आणि लोकशाही मार्गाने मत व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
     कुडाळ शहराचे प्रमुख प्रवेशद्वार असलेल्या काळपनाका जवळ मुख्य रस्त्यालगत हा बॅनर बुधवारी पहाटे लावण्यात आला आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे या बॅनरकडे सहज लक्ष वेधले जात आहे. या बॅनरची शहरात चर्चा सुरू असून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.

error: Content is protected !!