ठळक घडामोडी

आगामी भीषण आपत्काळातून तारण्यासाठी व ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही!

सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘रामराज्य’ स्थापनेचा जागर

सनातनच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
      ‘‘संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसर्‍या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजाला ग्रासलेले नैराश्य, अशा अत्यंत भीषण आणि अस्थिर परिस्थितीतून समाजाला तारण्यासाठी आता केवळ भौतिक उपाययोजना पुरेशा नाहीत. आज दिशाहीन झालेल्या समाजाला पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवर आधारित ‘रामराज्याची’ नितांत आवश्यकता आहे. मात्र, हे रामराज्य केवळ राजकीय किंवा भौतिक प्रयत्नांतून साकार होणार नाही, तर त्यासाठी समाजाला ‘साधनेचे’ आणि ‘गुरुचरणांचे’ भक्कम आध्यात्मिक अधिष्ठान असणे अनिवार्य आहे. जेव्हा समाजाची आध्यात्मिक श्रद्धा प्रत्यक्ष सुशासनात परिवर्तीत होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने रामराज्याची पहाट होते,’’ असे ओजस्वी प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ.अंजली मणेरीकर यांनी केले.
     सनातन संस्थेच्या वतीने कणकवली मातोश्री मंगल कार्यालय येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरुपौर्णिमा महोत्सवात’ त्या बोलत होत्या. यंदा संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, इंग्रजी, तेलुगु, मल्याळम् आदी विविध भाषांमध्ये देशभरात ८१ ठिकाणी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, मालवण, देवगड, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले येथे हा महोत्सव संपन्न झाला. आगामी जागतिक युद्धाचे आणि आपत्काळाचे सावट पहाता, हिंदूंनी प्रथमोपचार, अग्नीशमन आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले. सावंतवाडी येथे माजी सैनिक श्री. प्रमोद नाईक म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत केवळ पोलीस यंत्रणेवर संरक्षणासाठी अवलंबून न रहाता प्रत्येक हिंदुने स्वतःचे आणि स्वत:च्या कुटुंबाचे रक्षण करण्याइतपत सक्षम होणे आवश्यक आहे. देशातील पोलीस दलाची मर्यादित संख्या आणि उपलब्ध मनुष्यबळ पहाता प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेचे संपूर्ण दायित्व पोलीस यंत्रणा एकटी पार पाडू शकत नाही. त्यामुळे समाजाने स्वसंरक्षणासाठी सज्ज रहाण्याची आवश्यकता आहे. 
कुडाळ येथील कार्यक्रमात वेदमूर्ती श्री भूषण जोशी म्हणाले, श्री गुरूच आपल्याला उत्कर्षाचा संदेश देतात. जीवनातील सर्व बाजूच्या प्रगतीसाठी दृढ विश्वास देतात. साधनामय जीवनात अहंनिर्मुलनही महत्वाचे आहे. अहं निर्मुलन म्हणजे मीपणाचे निर्मूलन करणे. गुरूंकडे आपण सत्व अर्पण केले पाहिजे श्री गुरु व भगवंत यांच्याकडे जे सत्व अर्पण करतात तेच जीवनात यशस्वी होतात.
      देवगड येथे डॉ. मुकुल प्रभुदेसाई, वेंगुर्ले येथे श्री. सचिन परूळकर यांनी मनोगत व्यक्त केले. या महोत्सवात प्रारंभी श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य यावर लघुपट, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश वाचन, धर्मरक्षक आणि हिंदुनिष्ठ यांचे सत्कार, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, रामराज्याच्या स्थापनेसाठीचा संकल्प आणि नामजप भावपूर्णरित्या करण्यात आला. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, मल्याळम् या भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवा’चा लाभ देश-विदेशांतील हजारो भाविकांनी घेतला.             
     

error: Content is protected !!