ठळक घडामोडी

तुटलेल्या वीजवाहिनीचा शॉक; तीन दुभत्या म्हशींचा मृत्यू!

दोडामार्गातील घटना;  शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

दोडामार्ग : प्रतिनिधी
       शहरातील धाटवाडी-शिवकृपा नगर परिसरात तुटलेल्या विद्युतवाहिनीचा शॉक लागून तीन दुभत्या म्हशी दगावल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेत कसई येथील शेतकरी शिवराम वसंत साळकर यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. जीर्ण वीजवाहिन्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप साळकर यांनी महावितरण प्रशासनावर केला असून या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
        दोडामार्ग-आयी मार्गावरील धाटवाडी येथील शिवकृपा नगर भागातील वीजवाहिन्या अनेक दिवसांपासून धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती स्थानिकांनी वारंवार महावितरणकडे दिली होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने रविवारी एक विद्युतवाहिनी तुटून रस्त्यालगत पडली. विशेष म्हणजे तारा खाली पडूनही त्यामधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला नव्हता.
      दरम्यान, शेतकरी शिवराम साळकर यांनी आपल्या दुभत्या म्हशी चरण्यासाठी सोडल्या होत्या. चरणाऱ्या म्हशींचा तुटलेल्या विद्युतवाहिनीशी संपर्क येताच त्यांना तीव्र विद्युत धक्का बसला आणि तिन्ही म्हशींचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे साळकर यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरण विभागाला कळविण्यात आले. मात्र गंभीर स्वरूपाची दुर्घटना घडूनही संबंधित अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
       महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाची नोंद दोडामार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू आहे.
      जीर्ण वीजयंत्रणा ठरत आहे जीवघेणी
        दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही मोडकळीस आलेले वीजखांब, झिजलेल्या विद्युतवाहिन्या आणि धोकादायक वीजयंत्रणा कायम असल्याचे चित्र आहे. वेळेत दुरुस्ती व देखभाल न झाल्याने अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. तालुक्यातील जीर्ण वीजवाहिन्या आणि वीजखांब त्वरित बदलण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

error: Content is protected !!