ठळक घडामोडी

संघर्षाची शिदोरी, जनतेचा विश्वास; सभापती श्री. मिलिंद नाईक यांचा प्रेरणादायी प्रवास!

कुडाळ पंचायत समितीचे सभापती श्री.मिलिंद नाईक वाढदिवस विशेष

कुडाळ : सभापती श्री.मिलिंद नाईक

कुडाळ : माणसाचे मोठेपण हे त्याला मिळालेल्या पदावर नसून, ती खुर्ची मिळवण्यासाठी त्याने आयुष्यात सोसलेल्या यातना आणि गरिबीशी केलेल्या मुकाबल्यावर ठरते. ज्या हातांनी कधी मुंबईच्या गोदामात हमाली केली, रस्त्यावर लादी पुसली अन् कुडाळच्या रस्त्यांवर पोटासाठी रिक्षा चालवली; आज तेच हात कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदावरून तालुक्याच्या विकासाची चक्रे फिरवीत आहेत! तुळसुलीसारख्या छोट्याशा गावातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून उभा राहिलेला ‘मिलिंद जयश्री वसंत नाईक’ यांचा हा थक्क करणारा जीवनप्रवास केवळ राजकीय नसून, परिस्थितीला आव्हान देणाऱ्या एका ध्येयवेड्या माणसाच्या कष्टाची गाथा आहे. श्री.मिलिंद नाईक हे कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदावरून तालुक्याच्या विकासाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांचा आज (६ ऑगस्ट) रोजी वाढदिवस असून, यानिमित्त घेतलेला हा आढावा….!
      कष्टाच्या मुशीत घडलेले बालपण
       ६ ऑगस्ट १९८१ रोजी निसर्गाची मुक्त उधळण लाभलेल्या ‘वारंगाची तुळसुली’ या छोट्याशा गावात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात मिलिंदजींचा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. शेतीची थोडीफार उत्पन्न हीच काय ती उदरनिर्वाहाची दोरी. घरात कोणालाही नोकरीचा आधार नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीत तुळसुली बुडक्याचीवाडी शाळेत बालपणीचे दिवस व्यतीत करताना कष्टाचे आणि स्वाभिमानाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले.कुडाळ महाविद्यालयात पाऊल ठेवले खरे, पण घरच्या आर्थिक परिस्थितीने त्यांना जीवनाचा खरा वस्तुपाठ शिकवला. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी शिक्षणासोबतच संघर्षाची वाट धरली.
      कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. तिथे गोदामात हमाली केली, लादी पुसण्याचे काम केले, ठाण्याच्या गजबजलेल्या रस्त्यावर नारळ विकले. गावी परतल्यानंतर वैभववाडीत ट्रकवर क्लीनर म्हणूनही काम केले. पण हार मानणे त्यांच्या रक्तात नव्हते. पुढे स्वतःची रिक्षा घेऊन कुडाळ पोस्ट ऑफिस परिसरात ते रिक्षा चालवू लागले. स्वतःच्या कष्टाच्या भाकरीवर जगण्याची आणि स्वाभिमानाने उभे राहण्याची त्यांची वृत्ती याच काळात खऱ्या अर्थाने तावून-सुलाखून निघाली.
      महाविद्यालयीन वयातच त्यांना समाजकारणाची ओढ लागली.सन १९९९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सिंधुदुर्गाच्या भूमीत नारायण राणेंच्या नेतृत्वाचा प्रभाव होता. मिलिंदजींनी स्वतःला पूर्णपणे पक्षाच्या कामात झोकून दिले.पक्षाची शाखा संभाळणे, सामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणे आणि संजय पडते, काका कुडाळकर व तत्कालीन आ.शंकर कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली कामाचा धडाका सुरू ठेवणे,यामुळे ते लवकरच नेतृत्वाच्या नजरेत भरले. पुढे आ.शंकर कांबळी आणि त्यानंतर थेट नारायण राणे यांचे कुडाळ येथील स्वीय सहाय्यक  म्हणून काम करताना त्यांना प्रशासकीय शिस्त आणि कामाचा वेग जवळून शिकायला मिळाला.राजकारणात समीकरणे बदलतात, वारे बदलतात,त्या बदलात काही काळ त्यांनी दिशा बदलली पण नात्यातील आत्मीयता आणि निष्ठा कायम असल्यामुळे ते परत पुर्वीच्याच जागी आले.राणे कुटुंब हे आमचे राजकीय माहेर आहे, आम्ही त्यांचे कायमचे पाईक आहोत, ही त्यांची भावना त्यांच्यातील निष्ठावंताची ओळख पटवून देते.
      स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांचा प्रेरणादायी प्रवास!
सन २००७: तुळसुली ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून पहिली निवडणूक जिंकली.
२०१२: उपसरपंचपदी निवड होऊन गावाच्या विकासाचा पाया रचला.
२०१७: कुडाळ पंचायत समिती सदस्य म्हणून ग्रामीण भागात कामाचा ठसा उमटवला.
२०२३: तुळसुली तर्फ माणगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत जनतेने त्यांना भरघोस मताधिक्याने विजयी केले.
२०२६ आ.निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली साळगाव मतदारसंघातून विजय मिळविला व पुढे त्यांच्यावर कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली, ती ते यशस्वीपणे सांभाळत आहेत. शिवसेना आमदार निलेश राणे यांचे ते विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जातात. तालुक्याचा विकास हाच ध्यास त्यांनी घेतला आहे. रिक्षाच्या स्टिअरिंगवरून सुरू झालेला हा प्रवास आज कुडाळ पंचायत समितीच्या सभापती या सर्वोच्च खुर्चीपर्यंत पोहोचला, हा केवळ एका व्यक्तीचा विजय नसून कष्टाचा आणि जनसेवेचा विजय आहे. ते राजकारणासह समाज कारणात सक्रिय असून दशावतारी नाटकांची त्यांना आवड आहे.  शांत स्वभाव, दिलदार व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा मित्रपरिवार मोठा असून, जनसंपर्क दांडगा आहे.
     शांत, संयमी स्वभाव… कार्यकर्त्यांचा भक्कम आधारवड
        राजकारणात अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात, मात्र मिलिंद नाईक यांचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे त्यांचा शांत आणि संयमी स्वभाव. वाद घालण्यापेक्षा संवादातून मार्ग काढण्यावर त्यांचा विश्वास आहे. कोणाचाही अहंपणा न बाळगता, कोणताही भेदभाव न करता कार्यकर्त्याच्या हाकेला धावून जाणे, रात्री-अपरात्री कोणाच्याही अडचणीत पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. म्हणूनच आज कुडाळ तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे.
      पद हे प्रतिष्ठेसाठी नव्हे, तर लोकसेवेचे साधन आहे, हा विचार मिलिंद नाईक यांनी केवळ बोलून दाखवला नाही तर आपल्या कृतीतून  दाखवला आहे. या संपूर्ण राजकीय प्रवासात त्यांच्या कुटुंबासह पत्नी सौ.मिताली यांचा भक्कम पाठिंबा राहिला आहे.तुळसुलीच्या मातीत रुजलेले हे कष्टाचे रोपटे आज कुडाळ तालुक्याला आपल्या कामाची सावली देत आहे.अशा या नेत्तृत्वाला उत्तरोत्तर अशीच मोठ-मोठी पदे मिळत जावो, हीच ग्रामदैवत श्री देव लिंगेश्वर, श्री देव कुडाळेश्वर चरणी प्रार्थना, सभापती मिलिंद नाईक यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

error: Content is protected !!