जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर यांचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम
रोपांचे संगोपन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा दिवाळीत होणार गौरव
कुडाळ : प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी पिंगुळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या वतीने साळगाव येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक १ व क्रमांक ३ मधील विद्यार्थ्यांना आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले. बुधवार, दि. २९ जुलै रोजी झालेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वृक्षलागवड आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
यावेळी गंगाराम सडवेलकर यांनी विद्यार्थ्यांना झाडे कशी लावावीत, त्यांचे संगोपन कसे करावे तसेच पर्यावरणासाठी वृक्षांचे महत्त्व काय आहे, याविषयी मार्गदर्शन केले. केवळ रोपांचे वाटप न करता, वाटप केलेल्या रोपांची उत्तम मशागत करणाऱ्या तीन विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवड करून त्यांचा दिवाळीदरम्यान विशेष गौरव करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत उत्साह निर्माण झाला आहे.
या कार्यक्रमास शिवसेना (उबाठा)उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर, युवासेनेचे सुरज घाटकर, ग्रामपंचायत सदस्या सिध्दी मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बाबाजी सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुरूनाथ गावडे, मुख्याध्यापिका सौ. पालव, माजी विद्यार्थी विश्वनाथ केसकर, निलेश सावंत, शिक्षकवर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









