कुडाळचे सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन; तिसऱ्या वर्षीही भजन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद
सभापती मिलिंद नाईक यांनी दिल्या शुभेच्छा; साईधाम परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला
कुडाळ : प्रतिनिधी
साई सेवा समिती, खुटवळवाडी-घावनळे व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित भजन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज साईधाम, खुटवळवाडी येथे भक्तिमय वातावरणात पार पडला. कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या भजन स्पर्धेत गिवडक परिसरातील विविध गावांतील भजन मंडळांनी सहभाग घेतला असून, यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना सभापती मिलिंद नाईक यांनी अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकोपा वाढीस लागतो, असे सांगत आयोजकांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. यावेळी साई सेवा समितीच्या वतीने सभापती मिलिंद नाईक तसेच उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला साई सेवा समितीचे पदाधिकारी, परीक्षक श्री. गोठोसकर बुवा, श्री. गुरव बुवा, ग्रामस्थ तसेच भजनरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.









