ठळक घडामोडी

कुडाळ न.पं. त सत्ताधारी भाजपला धक्का, ज्येष्ठ नगरसेविका संध्या तेरसेंनी दिला राजीनामा!

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ नगरपंचायत मधील सत्ताधारी भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका सौ.संध्या प्रसाद तेरसे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा आज तडकाफडकी राजीनामा दिला. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी राजीनामा पत्र सादर केले आहे. त्यांच्या या निर्णयाने कुडाळ मधील सत्ताधारी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
      कुडाळ नगरपंचायतीच्या ताब्यातील १४१ गुंठे जमीन नगरपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे न.पं.च्या ताब्यातून निसटल्याचा गंभीर आरोप संध्या तेरसे यांनी करीत या प्रकरणी 10 जुलैला नगरपंचायतीसमोर उपोषणही केले होते. सदर जागा परत न.पं.च्या ताब्यात मिळण्यासाठी त्यांनी आक्रमकपणे लढा उभारला होता. नगरपंचायतीच्या विशेष सभेतही त्यांनी आक्रमकपणे आवाज उढवला होता. जर सदर जागेबाबत आपला स्वार्थ असेल तर नगरसेवक पदाचा राजीनामा देते, असे थेट आव्हानच संध्या तेरसेंनी 17 जुलैच्या न.पं.च्या विशेष सभेत प्रशासनाला दिले होते. दरम्यान त्यांनी आज नगरसेवक पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
   मी प्रशासनाच्या प्रमुखांकडून एखाद्या योग्य आणि सत्य समाजहिताच्या गोष्टीसाठी कायद्याला-नियमाला धरून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र न्याय नाहिच मिळाला पण साधी दखलही घेतली गेली नसल्याने माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे, असे संध्या तेरसे यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. दरम्यान त्यांच्या राजीनामुळे कुडाळ मधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, न.पं.त सत्तेत असलेला घटकपक्ष भाजप कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!