ठळक घडामोडी

मंडपाच्या ५५ हजारांच्या बिलावरून खडाजंगी; कुडाळ नगरपंचायतीच्या सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने!

एसटीपी जागेवरून नगरपंचायत सभेत गदारोळ; सभा थांबवून नगरसेवकांची प्रत्यक्ष पाहणी

नाट्यगृह खर्च आणि एसटीपी प्रस्तावावरून कुडाळ नगरपंचायतीत वादळी चर्चा; दोन मुद्द्यांनी सभा गाजली

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ मधील मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृहाच्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्यावेळच्या मंडप व इतर कामाचे 55 हजार रूपयांचे बिल अदा करण्यास मंजूरी देण्यासह शहरातील एसटीपी प्लांट साठी जागा आरक्षित करण्याच्या ठरावावरून कुडाळ न.पं.च्या सभेत जोरदार वादळी चर्चा झाली.
         कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा शुक्रवारी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासह नगरसेवक, खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
      कुडाळ मधील मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृहाच्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्यावेळच्या मंडप व इतर कामाचे 55 हजार रूपयांचे बिल अदा करण्यास मंजूरी देण्यावरून विरोधी गटाचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी आक्रमक भूमिका घेतली. सदरील कार्यक्रम पक्षीय होता की नगरपंचायत प्रशासनाचा होता? याची संबंधित प्रशासनाने सभागृहात आधी माहीती द्यावी अशी मागणी केली. मंदार शिरसाट यांनी उद्घाटन सोहळ्याचे फोटो दाखवत या कार्यक्रमात कोणताही राजनिष्ठाचार पाळला गेला नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी करून तेथे पक्षीय बॅनर लावण्यात आला मग प्रशासन त्यावर खर्च कसा करणार असा प्रश्न केला. त्यावर नगरसेवक विलास कुडाळकर, नयना मांजरेकर व चांदणी कांबळी यांनी सदरील बॅनर आम्ही पक्ष म्हणून लावू शकतो, त्याला खर्चाचा कोणताही विषय नाही, असे मंदार शिरसाट यांना सांगितले.  तसेच नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी तेथे नगरपंचायतीचाही बॅनर लावलेला होता, आणि त्याच्या बाजूला पक्षाचा बॅनर होता असे स्पष्टीकरण दिले. मात्र मंदार शिरसाट यांनी याबाबत प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी करीत न.पं. प्रशासनाचा राजकीय अजेंडा आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला. त्यावर नगराध्यक्षांनी आमदार निलेश राणे यांच्या सुचनेनुसार सदरील कार्यक्रम अचानक ठरला. खरंतर कार्यक्रम बाहेरील मोकळ्या जागेत घ्यायचा होता, मात्र त्याचवेळेस पाऊस असल्याने आतमध्ये कार्यक्रम घ्यावा लागला, असे स्पष्ट केले. परंतू मंदार शिरसाट आपल्या मागणीवर ठाम राहीले, बॅनरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही, उपनगराध्यक्षांचेही नाव नाही. आम्हाला विधानसभा सदस्यांचा आदरच आहे, आमचा शहराच्या विकासाला कोणताही विरोध नाही. परंतु अशाप्रकारे अचानक 50 हजार रूपये खर्च करणे म्हणजे ही रक्कम कमी वाटते का?, या कार्यक्रमाचा विषय सभागृहात अगोदर ठेवणे आवश्यक होते असे ते म्हणाले. नगरसेवक निलेश परब यांनीही शिरसाट यांच्या प्रश्नांना प्रशासनाने उत्तर देण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी सदर कार्यक्रमात न.पं. प्रशासनानेही बॅनर लावला होता. तेथे बाहेरच नारळ वाढवून भूमिपूजन केले जाणार होते, परंतू अचानक पाऊस सुरू झाल्याने कोणताही पर्यायच नसल्याने शेवटी आतमध्ये कार्यक्रम घ्यावा लागला, असे स्पष्ट केले. तर नगराध्यक्षांनी शहरात चांगले काम होत असताना अभिनंदन करायचे सोडून आक्षेप कसला घेताय असा सवाल शिरसाट यांना केला. तर शहरात विकास कामे झालीच पाहिजेत, त्याला आमचा कोणताही विरोध नाही, पण अचानक एखाद्या कार्यक्रम घेऊन, त्यासाठी अशाप्रकारे खर्च करावा का? असा सवाल केला. तसेच याप्रश्नी आपण आयुक्तांकडे दाद मागणार असून, मुख्याधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण इतिवृत्तात नोंद करण्याची मागणी शिरसाट यांनी यावेळी केली.
        शहरातील भंगसाळ नदी किनारील सार्वजनिक स्मशानभूमीलगत सांडपाणी प्रकल्पासाठी खासगी जागा संबंधित मालकांशी वाटाघाटी करून संपादित करण्याच्या विषय सभेसमोर ठेवण्यात आला. या विषयाचे वाचन होत असताना उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी सदर जागेबाबत मालकांशी बोलणी झाली का?, जर झाली असल्यास हा विषय यापूर्वी सभागृहात का ठेवला नाही?, आम्हा नगरसेवकांना याची माहीती का दिली नाही? असे सवाल उपस्थित करून प्रशासनाला कोंडीत पकडले. सत्ताधारी भाजपचे नगरसेवक निलेश परब यांनीही सदर विषय संबंधित जमीन मालकांना माहीत आहे आणि वाटाघाटीने जमीन मालकांची सहमती असे प्रशासन सांगतय मग, सर्व व्यवहार आधीच ठरविण्यात आले असतील तर आतापर्यंत सभागृहात का विषय ठेवला नाही? आम्ही नाममात्र नगरसेवक आहोत का? असा संतप्त सवाल प्रशासनाला केला. तर विरोधी ठाकरे गटाचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनीही या चर्चेत सहभाग घेत, सदरचा विषय शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, जागेची प्रत्यक्ष पाहणी न करता ठराव घेण्यास आपला विरोध असल्याचे सांगून, प्रत्यक्ष जागेची पाहणी करून नंतरच ठराव घ्यावा. यासाठी आठ दिवसांत विशेष सभा बोलावण्यात यावी अशी मागणी केली. हाच मुद्दा नगरसेवक निलेश परब यांनीही लावून धरीत, सभा संपल्यानंतर जागेची पाहणी करून येत्या मंगळवारी विशेष सभा बोलावण्यात यावी,अशी आक्रमक मागणी लावून धरली. या विषयी नगरसेविका चांदणी कांबळी यांनी सदरील जागा माझ्या प्रभागात येत असून, आपण संबंधित मालकांशी चर्चा करून सदर प्रकल्पासाठी जागा देण्यास सकारात्मक आहात का? अशी विचारणा करण्यात आली असून तशी फक्त प्राथमिक बोलणी झाल्याचे स्पष्ट केले. तर नगराध्यक्ष बांदेकर-शिरवलकर तसेच गटनेते विलास कुडाळकर यांनी सदर विषयीचा ठराव आजच्या सभेत घेऊया, पुढील बैठकीत त्यात सुधारणा करता येईल असे सूचित केले. मात्र नगरसेवकांनी त्याला विरोध करीत आधी जागेची पाहणी करण्याची मागणी लावून धरली. मुख्याधिकाऱ्यांनी सदरील विषयाबाबत जिल्हा प्रशासनाकडून वारंवार विचारणा होत असल्याने सदरचा ठराव आजच्या सभेत होणे अपेक्षित असल्याची वारंवार विनंती केली. यावर चला सभा होल्ड करून आताच पाहणी करूया, आणि मग ठरवा घेऊया असे सूचित करताच, मुख्याधिकाऱ्यांनी चालेल असे स्पष्ट केले. त्यावर नगराध्यक्ष बांदेकर-शिरवलकर यांनी सभा थांबविण्यास संमती देत, ज्यांना जागेची पाहणी करायचीय त्यांनी जाऊन यावे असे सांगितले.
      त्यानंतर दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास सभेचे कामकाज थांबवून, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक निलेश परब, विलास कुडाळकर, अक्षता खटावकर, चांदणी कांबळी, ज्योती जळवी, विरोधी नगरसेवक मंदार शिरसाट यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर जागेची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी एकूण ६० पैकी ३५ गुंठे जागेवर हा प्रकल्प करण्यात येणार असून, यासाठी ७ कोटी रूपये मंजूर झाले आहेत. सदरील जमीन मालकांशी वाटाघाटी करून जमीन संपादित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर १२.३२ वाजताच्या सुमारास सर्वजण सभागृहात दाखल झाल्यानंतर, सभेचे कामकाज पूर्ववत सुरू झाल्यानंतर, सदरील प्रकल्पासाठी जागा आरक्षित करण्याचा ठराव घेण्यात आला.विलास कुडाळकर यांनी, लोकशाही बळकट करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असून, या अंतर्गत खरेदी केल्या जाणा-या झेंड्यांचा अवमान होणार नाही तसेच प्रत्येक घरात ते पोचले जावेत, याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी सभागृहात केली.

error: Content is protected !!