कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरातील गणेशनगर येथील रहिवासी सौ. तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर (वय 36) यांनी घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची खबर त्यांचे दीर संजय विष्णू कुडाळकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे, अशी माहीती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली मात्र, या आत्महत्ये मागील कारण समजू शकले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेने कुडाळ शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती कुडाळ पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सचिन अवताडे यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार सखाराम भोई व नंदकिशोर नेरकर यांनी पंचनामा केला. तन्वी यांचे भाऊ बाहेरगावी असतात. ते येथे यायला निघाले असून रात्री उशिरा पर्यंत येथे पोहोचणार आहेत.त्यामुळे मृतदेहाचे विच्छेदन करून तो शवागृहात ठेवण्यात आला. तन्वी यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. तन्वी यांनी आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांच्या पश्चात पती,दोन मुलगे, दीर व अन्य परिवार आहे. टेम्पो व्यावसायिक सिद्धिविनायक कुडाळकर यांच्या त्या पत्नी तर रिक्षा व्यावसायिक संजय कुडाळकर यांच्या त्या वहिनी होत.









