ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे आदेश; ग्रामपंचायतींसह सर्व कार्यालयांत पावसाचे पाणी संकलन
भविष्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासनाचे मोठे पाऊल; पं.स.सदस्य योगेश धुरी यांची माहीती
कुडाळ : प्रतिनिधी
बदलत्या हवामानामुळे कमी होत चाललेले पावसाचे प्रमाण आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आपण पंचायत समितीच्या सभेत केलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या मागणीला यश आले आहे. पंचायत समितीच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती व उपकार्यालयांमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (पावसाचे पाणी पुनर्भरण) व्यवस्था उभारण्याचे निर्देश ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने संबंधित विभागांना दिले आहेत, अशी माहीती कुडाळ पंचायत समितीचे सदस्य योगेश धुरी यांनी दिली.
श्री.धुरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केलेय की, काही दिवसांपूर्वी झालेल्या कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत आपण हा महत्त्वाचा विषय उपस्थित केला होता. बदलत्या हवामानामुळे पावसाचे प्रमाण अनिश्चित होत असून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहून जात असल्याने भूजल पातळी झपाट्याने खालावत असल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यापूर्वी शासकीय कार्यालयांनीच ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची अंमलबजावणी करून आदर्श निर्माण करावा, अशी मागणी केली होती. या जनहिताच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पंचायत समितीच्या अखत्यारीतील सर्व ग्रामपंचायती, उपकार्यालये आणि इतर शासकीय इमारतींमध्ये पावसाचे पाणी संकलन व भूजल पुनर्भरणासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे भविष्यात भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून पाण्याचा शाश्वत वापर आणि जलसंवर्धनाला चालना मिळणार आहे, अशी माहीती पं.स.सदस्य श्री.धुरी यांनी दिली.









