ठळक घडामोडी

कुडाळजवळ हॉटेलमध्ये जेवण, बिल थकवले आणि मोबाईलही पळविला!

पळून जाणा-या युवकांची कार खारेपाटणला पोलिसांनी पकडली

कुडाळातील प्रकारानंतर काही मिनिटांत पोलिसांची तत्परता

कुडाळ : प्रतिनिधी
       मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ शहरालगतच्या एका हॉटेलमध्ये जेवण करून बिलाची रक्कम न भरता हॉटेल मालकाचा मोबाईल घेऊन कारमधून रत्नागिरीच्या दिशेने पसार झालेल्या पाच युवकांना पोलिसांनी अवघ्या काही वेळात खारेपाटण येथे नाकाबंदी करून ताब्यात घेतले. डायल 112 वरून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्परता दाखवत ही कारवाई केली. ही घटना आज सोमवारी दुपारी घडली.
      मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरून कारने प्रवास करणारे पाच युवक कुडाळलगतच्या एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी बिलाची रक्कम न भरता हॉटेल मालकाचा मोबाईल घेऊन तेथून कारसह पळ काढला. हा प्रकार लक्षात येताच हॉटेल मालकाने तातडीने डायल 112 वर संपर्क साधून कुडाळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तात्काळ यंत्रणा सक्रिय करत संबंधित वाहनाचा शोध सुरू केला. सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा संदेश देण्यात आला. त्यानुसार खारेपाटण येथे पोलिसांनी नाकाबंदी करून संशयित कार अडवली आणि त्यामधील पाच युवकांना ताब्यात घेतले. खारेपाटण पोलिसांनी याबाबत कुडाळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी कुडाळ पोलिसांचे पथक सायंकाळी खारेपाटणकडे रवाना झाले. संबंधित युवकांना कुडाळ पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडून सखोल चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

error: Content is protected !!