माजी सरपंच पप्या तवटे यांचा महामार्ग प्रशासनाला आक्रमक इशारा
घावनळेफाटा जवळ महामार्गाची लेन ठरतेय अपघांचा ‘हाॅटस्पाॅट‘
कुडाळ : प्रतिनिधी
पावशी-घावनळेफाटा बॉक्सेलजवळ मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळहून कणकवलीच्या दिशेने जाणारा टेम्पो साचलेल्या पाण्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून महामार्गावर पलटी झाला. हा अपघात सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर कुडाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पावसाळ्यात या ठिकाणची लेन वारंवार अपघातांना कारणीभूत ठरत असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा पावशी ग्रामस्थांच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पावशीचे माजी सरपंच श्रीपाद (पप्या) तवटे यांनी दिला आहे.
त्या ठिकाणच्या लेनवर पावसाळ्यात महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. तसेच रस्त्याच्या तांत्रिक दोषांमुळे वाहनांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन वर्षांत याच ठिकाणी ४० हून अधिक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या धोकादायक ठिकाणाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. महामार्गाची तांत्रिक पाहणी करून अपघातांची कारणे शोधून तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पावशीचे माजी सरपंच श्रीपाद (पप्या) तवटे यांनी केली आहे. येत्या आठ दिवसांच्या आत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून योग्य उपाययोजना कराव्यात, अन्यथा महामार्गावर जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पप्या तवटे यांनी दिला आहे.
दरम्यान, पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहने उंच उडून पलटी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही वाहने महामार्गालगतच्या संरक्षक कठड्यांवर आदळल्याने मोठी दुर्घटना घडण्याचीही भीती व्यक्त होत आहे. या ठिकाणी सुरू असलेले अपघातांचे सत्र थांबविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थांनी पुन्हा एकदा केली आहे.









