सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा; कुडाळात संयुक्त धरणे आंदोलनाची हाक
विद्यार्थ्यांसह पालकांनी सहभागी होण्याचे आवाहन
कुडाळ : प्रतिनिधी
नीट परीक्षा पेपर फुटीमुळे देशातील लाखो मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले, या सर्वाला जबाबदार असणारे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सोमवार, दि. २० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता कुडाळ तहसील कार्यालयासमोर शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि मनसे यांच्या वतीने धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, आदी आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत. याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा निषेधही व्यक्त करण्यात येणार असून, लोकशाही व संविधानाने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणीही आंदोलनातून करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, लोकशाहीचा आणि संविधानिक मूल्यांच्या संरक्षणाचा प्रश्न लक्षात घेऊन आयोजित या धरणे आंदोलनात विद्यार्थी, पालक, नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजन नाईक, अभय शिरसाट, शिवाजी घोगळे आणि जगन्नाथ गावडे यांनी केले आहे.









