ठळक घडामोडी

आंबोली मान्सून मॅरेथॉनसाठी सिंधुदुर्गासह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातून ७०० धावपटू सज्ज!

रिमझिम पाऊस, धुक्याची चादर अन् सह्याद्रीच्या सान्निध्यात उद्या धावणार आंबोली

२१, १० व ५ किमी गटात रंगणार आंबोली मान्सून मॅरेथॉन; आकर्षक बक्षिसांची लयलूट

कुडाळ : प्रतिनिधी
      सह्याद्री अॅडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली-सांगेली आणि सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, रविवार (दि. २ ऑगस्ट) रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंबोली मान्सून मॅरेथॉन स्पर्धेसाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकसह विविध राज्यांतील सुमारे ७०० धावपटूंनी नोंदणी केली असल्याची माहिती गजानन कांदळगावकर आणि मायकेल डिसोजा यांनी दिली.
        आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात होणारी ही मॅरेथॉन २१ कि.मी., १० कि.मी. आणि ५ कि.मी. अशा तीन गटांत होणार आहे. ५ कि.मी. स्पर्धा आंबोली चेकपोस्ट ते शिरगावकर सनसेट पॉइंट, १० कि.मी. स्पर्धा आंबोली चेकपोस्ट ते नेणेवाडी, तर २१ कि.मी. स्पर्धा आंबोली चेकपोस्ट ते चौकुळ-तोरपवाडी मार्गावर होणार आहे.
      स्पर्धेतील २१ कि.मी. गटातील प्रथम विजेत्याला २० हजार रुपये व चषक, द्वितीय विजेत्याला १५ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. १० कि.मी. गटातील प्रथम विजेत्याला १० हजार रुपये, द्वितीय विजेत्याला ७ हजार रुपये व चषक मिळणार असून ५ कि.मी. गटातील सर्व स्पर्धकांना मेडल व सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ३५ ते ४५, ४५ ते ६० आणि ६० वर्षांवरील पुरुष व महिला अशा विविध वयोगटांत स्पर्धा होणार आहे.
      स्पर्धेचे उद्घाटन व फ्लॅग ऑफ सकाळी ७ वाजता होणार असून सकाळी ९ वाजता पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होईल. यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, विशाल सेवा फाउंडेशनचे विशाल परब, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
      आंबोलीच्या गार हवेत, रिमझिम पावसात आणि धुक्याच्या सान्निध्यात धावण्याचा अनोखा अनुभव घेण्यासाठी तसेच स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी नागरिक, पर्यटक आणि धावपटूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!