ठळक घडामोडी

भातशेतीत ग्लिरिसिडियाद्वारे ग्रीन मॅन्युरिंगचे प्रात्यक्षिक; बेळणेतील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
      सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी आणि भातशेतीची सुपीकता वाढविण्याच्या उद्देशाने कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांनी बेळणे गावातील भातशेतात ग्लिरिसिडियाद्वारे ग्रीन मॅन्युरिंगचे प्रात्यक्षिक सादर केले. या उपक्रमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देत आधुनिक आणि पर्यावरणपूरक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली.
      प्रात्यक्षिकादरम्यान ग्लिरिसिडियाचा हिरवा पालापाचोळा भातशेतात समान प्रमाणात पसरवून चिखलणी प्रक्रियेदरम्यान जमिनीत मिसळण्यात आला. या पद्धतीमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, सुपीकता सुधारते, उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वाढीस चालना मिळते तसेच रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होऊन भात पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते, अशी माहिती विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना दिली.
     यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी ग्रीन मॅन्युरिंग तंत्रज्ञानाबाबत उत्सुकता दाखवत विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून या तंत्राचा प्रत्यक्ष शेतीत अवलंब करण्याचे आवाहन केले.
      या उपक्रमात कृषी विद्यार्थी प्रतीक सावंत, करण पाटील, साहिल भोईटे, राज जगताप, रोहन पवार, दुर्वांक घोडके, शिवम पुजारी, सुयश डोंगरकर, प्रथमेश शिंदे आणि अविनाश परिहार यांनी सक्रिय सहभाग घेतला.
      विषय शिक्षिका डॉ. दर्शना कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज संते यांच्या प्रेरणेने तसेच रावे कार्यक्रम समन्वयक प्रा. वेदांत जोशी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

error: Content is protected !!