

कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कुडाळ येथील हॉटेल आराध्या हॉल येथे आज स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी अजितदादांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे यांनी भावूक होत अजितदादांच्या रूपाने आमचा देव हरपला अशा भावना व्यक्त केल्या, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एम. के. गावडे यांनी असे होतील बहु… परि यासम हाच या शब्दांत दादांचे नेतृत्व अधोरेखित करत आदरांजली वाहिली. महिला जिल्हाध्यक्ष सौ.परब यांनी महिला कार्यकारिणीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमात एकनाथ केसरकर यांनी अजितदादांची कार्यपद्धती आणि जीवनशैली विषयी माहिती दिली. कुडाळ माजी उपसभापती आर. के. सावंत व वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर यांनी आपले विचार मांडले.
यावेळी मुकुंद धुरी, मनोहर साटम, रवींद्र म्हाडगुत, संतोष सावंत, उमेश पेंडुरकर, शैलजा राणे, अंकिता देसाई, रेणुका राणे, गोपाळ सावंत, प्रेमनाथ बांदेकर, श्याम शेटकर यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अजितदादा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









