नगरसेवक मंदार शिरसाट यांनी पाठिंबा दर्शविणारा लावलाय बॅनर
ठाकरे युवासेनेची आज विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी स्वाक्षरी मोहीम

कुडाळ : प्रतिनिधी
चला, एका चांगल्या उद्यासाठी…एकत्र उभे राहुया! या टॅगलाईनखाली सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारा बॅनर्स कुडाळ शहरातही झळकला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा कुडाळ न.पं चे नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी हा श्री.वांगचुक यांना पाठींबा देणारा बॅनर्स लावला आहे. सोनम वांगचुक यांना आम्ही पाठींबा देतो, सध्या ते आमरण उपोषणावर आहेत. एका अशा कारणासाठी, ज्यावर त्यांचा मनापासून विश्वास आहे. आवाज नसलेल्यांचा आवाज…उद्याचा चांगला समाज घडवण्याचा आपला निश्चय…! अशा आशयाचा शहरातील अनंत मुक्ताई समोर लावण्यात आलेला हा बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
तसेच देशातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या ‘पेपर फुटी’च्या गंभीर प्रकरणांविरोधात आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि सीजेपीचे अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज सोमवारी २० जुलै सकाळी ११.३० वाजता कुडाळ हायस्कूलसमोर ‘एक सही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ या विशेष स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेतर्फे या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट आणि युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिली.
सध्या देशपातळीवर विविध स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक परीक्षांचे पेपर फुटत असल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा झाला आहे. या अन्यायाविरोधात सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके यांनी आक्रमक पाऊल उचलत आंदोलन सुरू केले आहे. देशाच्या शिक्षण व्यवस्थेला लागलेली ही कीड थांबवण्यासाठी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी कुडाळमधील ठाकरे युवासेनेने या लढ्यात उडी घेतली आहे.
या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून केंद्र सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जाणार आहे. तरी कुडाळ परिसरातील सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, तरुण आणि नागरिकांनी उद्या सोमवारी सकाळी ११.३० वाजता कुडाळ हायस्कूलसमोर उपस्थित राहून ‘एक सही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ या मोहिमेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट आणि युवा सेना तालुका प्रमुख योगेश धुरी यांनी केले आहे.









