स्टाफ नर्सची रिक्त जागा तातडीने भरण्याच्या सूचना
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी आज कुडाळ येथील ‘बाळासाहेब ठाकरे शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र’ (आपला दवाखाना) येथे भेट देऊन आरोग्यसेवा, ओपीडी आणि रुग्णांना उपलब्ध सुविधांची पाहणी केली. यावेळी स्टाफ नर्सची जागा रिक्त असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ तालुका व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नियुक्तीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. डॉ. तेजस रावले व आरोग्य सेवक भगवान हुमरमळेकर उपस्थित होते. नागरिकांना दर्जेदार व अखंड आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही सभापती नाईक यांनी दिले.









