शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांचा पुढाकार
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज आयोजित करण्यात आलेल्या एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये २०० रुपये किमतीचे एस.टी. स्मार्ट कार्ड अवघ्या १५० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आल्याने मोठ्या संख्येने नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस.टी.) प्रवाशांच्या सुविधेसाठी स्मार्ट कार्ड प्रणाली सुरू केली आहे. या कार्डच्या माध्यमातून एस.टी. बसमधील प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर होणार असून, तिकीट व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची मानली जात आहे. ही सुविधा कुडाळ शहरातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने शिवसेना कुडाळ शहर प्रमुख अभिषेक गावडे यांच्या माध्यमातून शहर शिवसेनेच्या वतीने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे नियोजन आणि आयोजन स्मार्ट कार्ड फ्रँचायझी प्रमुख पूजा पेडणेकर यांनी शहर प्रमुख अभिषेक गावडे यांच्या माध्यमातून केले. शिबिरात विविध वयोगटातील नागरिकांनी उपस्थित राहून स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली तसेच या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी विधानसभा बीएलए प्रमुख काका कुडाळकर, तालुका प्रमुख विनायक राणे, सभापती मिलिंद नाईक, शहर प्रमुख अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, सौ. रेवती राणे, राजवीर पाटील, राकेश नेमळेकर, प्रथमेश केळबाईकर, प्रथमेश कांबळी आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील नागरिकांना शासनाच्या विविध सुविधा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही अशा लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी आयोजकांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.









