तहसील कार्यालयासमोर शिवसेना(उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) व मनसेचे जोरदार आंदोलन
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन
कुडाळ : प्रतिनिधी
नीट, जेईई आणि टीईटी परीक्षांच्या कथित पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याला जबाबदार असणा-या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सोमवारी (दि. २०) सकाळी कुडाळ तहसील कार्यालयासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि मनसेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून वांगचुक आणि दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला तसेच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्या घेण्यात यावा तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले.
आंदोलनानंतर कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नीट, जेईई व टीईटी परीक्षांमधील कथित पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दिल्लीतील जंतरमंतर येथे सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यात आला. आंदोलनकर्त्यांशी केंद्र सरकारने संवाद साधावा आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर व कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार श्रीकृष्ण शिरसाट, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, विजय प्रभू, युवक काँग्रेसचे मंदार चंद्रकांत शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, संतोष शिरसाट, बाळा पावसकर, बाळ कनयाळकर, सुशिल चिंदरकर, तबरेज शेख, मनसे मालवण शहराध्यक्ष सागर जाधव, प्रथमेश धुरी, यतीन माजगावकर, संतोष गावडे, दिनार चव्हाण, सुशांत परब, अनिकेत गावडे, सागर मयेकर, अविनाश अणावकर, विजय लाड, परेश गावकर, अनुवास नाईक, सुभाष नाईक, शंकर नाईक यांच्यासह शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.









