ठळक घडामोडी

गिरिपुष्पाद्वारे हिरवळीच्या खताचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा संदेश!

हुंबरट येथे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

कणकवली : प्रतिनिधी
     रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली सलग्न कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील कृषी विद्यार्थ्यांनी हुंबरट येथील शेतकऱ्यांच्या भातशेतात गिरिपुष्पाचा वापर करून हिरवळीच्या खताचे प्रात्यक्षिक सादर केले. या उपक्रमात कृषी विद्यार्थी संकेत दुपडे, माणकोजी लोंढे, विजय तांबे, धुळा करे, प्रतिक कुंभार, सुयश प्रभुखानोलकर, शिवा कादरी, मधु कुमार, आयुष काळे आणि दयाकर रेड्डी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
     या प्रात्यक्षिकामध्ये गिरिपुष्पाचा हिरवा पालापाचोळा शेतात समान प्रमाणात पसरवून चिखलणी (Puddling) दरम्यान जमिनीत मिसळण्यात आला. यावेळी हिरवळीच्या खताचे महत्त्व, जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे, सुपीकता सुधारणे, उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वाढीस चालना देणे तसेच रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून भात पिकाच्या उत्पादनात वाढ करण्यास होणारी मदत याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनीही या तंत्रज्ञानाबाबत उत्सुकता दाखवत विविध प्रश्न विचारून माहिती घेतली.
     हा उपक्रम विषय शिक्षक डॉ. दर्शना कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली सलग्न कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट चे प्राचार्य डॉ. पंकज संते यांच्या प्रेरणेने तसेच रावे कार्यक्रम समन्वयक प्रा. वेदांत जोशी यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.

error: Content is protected !!