निलेश राणे यांनी मांडलेल्या महसूल विभागाच्या सर्व विषयांवर निर्णय घेणार : मंत्री बावनकुळे
नारायण राणेंच्या दूरदृष्टीच्या निर्णयांचा वारसा पुढे नेत आहोत – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
कणकवली : प्रतिनिधी
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या कार्याचे जाहीर कौतुक केले. कणकवली येथे आज महसूल समाधान शिबिरात श्री.बावनकुळे बोलत होते.
आमदार निलेश राणे यांच्याबाबत बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विधानसभेत ते महसूल विभागाशी संबंधित विषय अत्यंत अभ्यासपूर्ण, तळमळीने आणि जनहिताची भूमिका मांडत आहेत. त्यांनी सिंधुदुर्गच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, त्यांनी मांडलेल्या महसूल विभागाच्या सर्व विषयांवर निर्णय घेण्याचे मी वचन देतो, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा माजी महसूल मंत्री नारायण राणे यांच्या कार्याचाही गौरव करत, महसूल मंत्री म्हणून नारायण राणे यांनी घेतलेल्या अनेक दूरदृष्टीच्या निर्णयांचा पाया आजही भक्कम आहे. त्या निर्णयांना पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. कोकण दौऱ्यावर येण्यापूर्वी मी त्यांचा आशीर्वाद घेतला, असेही त्यांनी सांगितले.









