ठळक घडामोडी

गणेशोत्सव दरम्यान घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगची २५ दिवसांची अट शिथिल करा!

कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

व्यावसायिक सिलिंडरचा अतिरिक्त साठा उपलब्ध करण्याचीही मागणी

कुडाळ : प्रतिनिधी
      गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी असलेली २५ दिवसांची अट तात्पुरती शिथिल करण्यात यावी तसेच व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरचा सुरळीत पुरवठा आणि अतिरिक्त साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाचे कुडाळ मधील नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
      निवेदनात म्हटले आहे की, कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव हा सर्वात मोठा आणि श्रद्धेचा सण आहे. या काळात मुंबई, पुणे व इतर शहरांतील लाखो चाकरमानी आपल्या गावी येत असल्याने प्रत्येक घरातील गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. महाप्रसाद, नैवेद्य आणि विविध पक्वान्नांसाठी घरगुती गॅसची गरज नेहमीपेक्षा अधिक भासते. मात्र, गॅस कंपन्यांनी लागू केलेल्या २५ दिवसांच्या बुकिंग अटीमुळे अनेक कुटुंबांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
       गणेशोत्सवाच्या सुमारे ४५ दिवस आधीच प्रशासनाला निवेदन देत श्री.शिरसाट यांनी या समस्येकडे लक्ष वेधले आहे. प्रशासनाने गॅस कंपन्यांशी समन्वय साधून आगाऊ नियोजन करावे, जेणेकरून उत्सव काळात कोणताही तुटवडा निर्माण होणार नाही, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनात घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगवरील २५ दिवसांची अट गणेश चतुर्थीपूर्वी १५ दिवस आणि उत्सवानंतर १५ दिवस, अशा एक महिन्याच्या कालावधीसाठी शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे गरज भासल्यास नागरिकांना दुसरा सिलिंडर तातडीने बुक करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच गणेशोत्सवात हॉटेल्स, खानावळी, मिठाई दुकाने, बेकरी आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याने १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची मागणी वाढते. त्यामुळे गॅस कंपन्यांनी जिल्ह्यात अतिरिक्त ‘बफर स्टॉक’ उपलब्ध करून ठेवावा आणि व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा अखंडित ठेवावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
     “गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. गॅसअभावी कोणत्याही कुटुंबाला किंवा व्यावसायिकाला अडचणींचा सामना करावा लागू नये. प्रशासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी,” अशी अपेक्षा नगरसेवक मंदार शिरसाट यांनी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक संतोष शिरसाट, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, अमित राणे, शैलेश काळप, संदीप म्हाडेश्वर, गुरु गडकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!