विद्यार्थ्यांसाठी दोन महिन्यांचा कौशल्य विकास उपक्रम; ४० विद्यार्थ्यांचा सहभाग
कॉयर बोर्डकडून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना मिळणार प्रमाणपत्र
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून दोन महिन्यांच्या काथ्या उद्योग प्रशिक्षणाला उत्साहात सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या आयक्यूएसी (IQAC) आणि प्लेसमेंट सेलच्या संयुक्त विद्यमाने या विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कॉयर बोर्ड ऑफ इंडियाचे (रीजनल ऑफिस, कणकवली) श्री. बी. श्रीनिवास आणि सौ. राधिका पावसकर उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. बी. श्रीनिवास यांनी स्पष्ट केले की, केंद्रीय उद्योग मंत्री श्री. नारायण राणे यांच्या प्रयत्नातूनच या जिल्ह्यामध्ये कॉयर बोर्डचे रिजनल ऑफिस स्थापन झाले आहे. या केंद्राच्या माध्यमातून २ महिने, ६ महिने आणि १ वर्षाचे प्रशिक्षण कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात. जिल्ह्यात काथ्या उद्योग वाढीस लागावा यासाठी केंद्रातर्फे सर्वतोपरी मदत केली जाते.
त्यांनी काथ्या व्यवसायाचे अर्थकारण समजावून सांगताना हा व्यवसाय अत्यंत फायदेशीर कसा आहे, हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच, महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करण्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे सांगत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. यावेळी मुख्य प्रशिक्षक श्री. राजाराम राऊळ व सौ. रुची राऊळ उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना काथ्यापासून दोरी विणणे, दोरीपासून पायपुसणी बनवणे तसेच विविध शोभेच्या वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती राजाराम राऊळ यांनी दिली. तसेच प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कॉयर बोर्ड ऑफ इंडियाकडून अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि कौशल्य वाढीस लागावे यासाठी महाविद्यालय सातत्याने विविध कौशल्य विकास कार्यक्रम राबवत असते, काथ्या प्रशिक्षण हा त्याच उपक्रमाचा एक भाग आहे. विद्यार्थ्यांनी विविध शासकीय योजनांचा योग्य फायदा घेऊन यशस्वी उद्योजक बनले पाहिजे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःचा उद्योग सुरू केल्यास या प्रशिक्षणाचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, उपस्थितांचे स्वागत आणि आभार प्रदर्शन डॉ. रवींद्र ठाकूर यांनी केले. तर या प्रसंगी डॉ. एस. एल. लोखंडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या प्रशिक्षणामध्ये चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.









