ठळक घडामोडी

हरिनामाच्या गजरात कुडाळ दुमदुमले; शहरात भक्तीमय वातावरण!

श्री देव मारुती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह; धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

जिल्हास्तरीय संगीत, दिंडी चक्री वारकरी आणि वारकरी भजन स्पर्धेत नामवंत मंडळांचा सहभाग

कुडाळ : प्रतिनिधी
        कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात हरिनाम सप्ताहाला आज शनिवारपासून भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली. यानिमित्त जिल्हास्तरीय संगीत, चक्री वारकरी आणि वारकरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत भजन स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. या भजन स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत भजन मंडळांनी सहभाग घेतला आहे. या सप्ताहानिमित्त शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
        श्री देव मारुती नगर ब्राह्मण देवस्थान कमिटीच्या वतीने दि. १९ ते २५ जुलै या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे. मंदिरात आज सकाळी घटस्थापना करण्यात आली असून, दिवसभर अखंड नामस्मरण तसेच भजनांचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. संगीत भजन स्पर्धेचा उदघाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, देवस्थान समिती पदाधिकारी, भजनरसिक, भाविक व कुडाळवासिय नागरिक उपस्थित होते.
      या सप्ताहादरम्यान दि. २३ जुलै रोजी आंतरराज्य दिंडी चक्री वारकरी भजन स्पर्धा, तर दि. २४ जुलै रोजी जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच दि. २० ते २५ जुलै या कालावधीत दररोज सायंकाळी ५ वाजता देवगड येथील दिंडी वारकरी भजनाचे सादरीकरण होणार आहे. हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने संगीत भजन, चक्री वारकरी भजन व वारकरी भजन स्पर्धांद्वारे हरिनामाचा जागर केला जातो. या स्पर्धांमध्ये नामवंत भजन मंडळांचा सहभाग असतो. त्यामुळे भजनप्रेमी व रसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. दि. २५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत चित्ररथ दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता काल्याने सप्ताहाची सांगता होणार असून, दि. २७ जुलै रोजी दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांनी आणि भजन रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव मारुती नगर ब्राह्मण देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!