पाऊस, धुके अन् मृत्यूशी झुंज; सह्याद्री रेस्क्यू टीमची धाडसी मोहीम यशस्वी
सिंधुदुर्ग : आंबोली येथील प्रसिद्ध महादेवगड पॉईट येथे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमाराला पाय घसरून सहाशे फूट खोल दरीत कोसळलेल्या निपाणीच्या पर्यटकांचा मृतदेह बुधवारी सकाळी राबविलेल्या सहा तासाच्या अथक मोहिमेनंतर दरीतून बाहेर काढण्यात यश आले आहे.
हि दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. बेळगावी जिल्ह्यातले दहा पर्यटक आंबोली इथं पर्यटनासाठी आले होते. आंबोलीतले सर्व पॉईंट पाहून ते शेवटी पाच वाजण्याच्या सुमाराला महादेवगड पॉईंट इथं आले. त्या ठिकाणी त्या पर्यटकांपैकी डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) हे रेलिंग वरून पलीकडे लघुशंकेसाठी गेले असता त्यांचा तोल जाऊन ते ६०० फूट खोल दरीत कोसळले होते. पॉईंटवर मक्याची कणसे विकणाऱ्या एका स्थानिक विक्रेत्याने डॉ अयुब याना दरीत कोसळताना पाहिले आणि तात्काळ या अपघाताची माहिती सह्याद्री ऍडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोलीच्या सदस्यांना तसेच पोलिसांना दिली.
रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. मात्र, परिसरात सुरू असणारा संततधार पाऊस, दाट धुके आणि अंधारामुळे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही शोधमोहीम तात्पुरती थांबवावी लागली.
रेस्क्यू टीमच्या माहितीनुसार, संबंधित पर्यटक पारपोली येथील सिद्धेश्वर मंदिरापासून सुमारे दोनशे फूट पुढे असलेल्या जंगल भागात कोसळला होता. अपघात घडला त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीचा मोबाईल वरच राहिला असल्याने मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेणे अशक्य झाले होते. या प्रतिकूल परिस्थितीमुळे मंगळवारी सायंकाळी थांबवण्यात आलेली रेस्क्यू मोहीम बुधवारी सकाळी साडेसहा वाजता पुन्हा सुरु करण्यात आली.
बुधवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस, धुके आणि थंडीत शोधकार्य सुरु झाले. दोन तास प्रयत्न करून सुमारे २५० फूट उतरून गेल्यावर पर्यटकांपर्यंत पोहोचण्यात रेस्क्यू टीमला यश आले. दुर्दैवाने पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रेस्क्यू स्ट्रेचर वर मृतदेह बांधून तो मृतदेह वरती घेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. दुपारी साडेबारा वाजता मृतदेह वरती काढण्यात आला. वर आल्यावर ओळख पटवून पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
या बचाव कार्यात सह्याद्री ऍडव्हेंचर अँड रेस्क्यूचे सदस्य बाबल आल्मेडा, मायकल डिसोजा, संतान आल्मेडा, उत्तम नार्वेकर, लॉरेन्स आल्मेडा, राजू राऊळ, प्रथमेश गावडे, पास्कु देसा, अजित नार्वेकर, समीर गावडे, आनंद गावडे, विशाल बांदेकर, प्रतीक मोहिते, नारायण चव्हाण शुभम कळसुलकर, सर्वेश नाईक, मनीष नार्वेकर, वामन पालेकर, राकेश अमरुस्कर, दीपक मेस्त्री, अजित गावडे, गुरूनाथ सावंत, अभिजित नावेकर, हेमंत नार्वेकर, मिलिंद म्हापसेकर यांनी सहभाग घेतला. दरम्यान या घटनेच्या अधिक तपासानंतर नेमकी परिस्थिती स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली.









