ठळक घडामोडी

कुडाळमध्ये विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अटकेत!

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ शहरातील गणेशनगर येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी कुडाळ पोलिसांनी पती सिद्धिविनायक विष्णू कुडाळकर (वय ४२, रा. गणेशनगर, कुडाळ) याला आज अटक केली आहे. पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर असून, बुधवारी त्याला कुडाळ न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
     काल सोमवारी सकाळी सौ.तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर (वय ३६) यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर त्यांचे भाऊ भूषण सुभाष सांगेलकर (वय ३९, रा. सांगेली, ता. सावंतवाडी, सध्या डोंबिवली पूर्व) यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम १०८ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. फिर्यादीनुसार, तन्वी यांचे माहेरचे नाव सोनाली सुभाष सांगेलकर असून सुमारे १५ वर्षांपूर्वी त्यांचा सिद्धिविनायक कुडाळकर यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर काही वर्षे संसार सुरळीत सुरू होता. मात्र, त्यानंतर पतीकडून त्यांचा मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. वारंवार शिवीगाळ, मारहाण, तसेच माहेरच्या आई-वडील, भाऊ आणि नातेवाईकांशी संपर्क ठेवण्यास मज्जाव करण्यात येत होता. एवढेच नव्हे तर त्यांच्या भावाचा मोबाईल क्रमांकही ब्लॉक करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
     तक्रारीनुसार, सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून तन्वी यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात कुडाळ पोलिसांनी संशयिताला अटक केली असून त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरुदास पाडावे करीत आहेत. दरम्यान, मयत तन्वी कुडाळकर यांच्यावर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने गणेशनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!